चारशे पारच्या स्वप्नांना पहिल्या दोन टप्प्यांतच महाराष्ट्रात सुरुंग

0

मुंबई,दि.28: दैनिक सामनाच्या रोखठोक सदरातून संजय राऊत यांनी मोदी-शाहांवर जोरदार टीका केली आहे. मोदी लाटेचा बुडबुडा लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्यांतच फुटला आहे. त्यामुळे विश्वगुरू मोदी यांनी ‘मुसलमान तुमची मंगळसूत्रे पळवतील’ हा मुद्दा प्रचारात आणला. याचा अर्थ मोदींकडे कोणतेच मुद्दे उरले नाहीत. पहिल्या दोन्ही टप्प्यांत मोदी पूर्णपणे पिछाडीवर पडल्याचे चित्र आहे. असे सामनाच्या रोखठोकमध्ये म्हटले आहे.

मोदींचा हा प्रचार म्हणजे ढोंग

लोकसभेचा दुसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला व नरेंद्र मोदींकडील प्रचाराचे सर्व मुद्देही संपले. त्यामुळे देशातील महिलांच्या मंगळसूत्रांचे काय होणार? हा प्रश्न त्यांनी निर्माण केला. मोदींचा हा प्रचार म्हणजे ढोंग आणि फसवेगिरी आहे. मोदी यांनी आतापर्यंत कधीच मंगळसूत्र या पवित्र बंधनाचा स्वीकार आणि सन्मान केला नाही, मात्र आता तेच मोदी निवडणुका जिंकण्यासाठी मंगळसूत्रावर प्रवचने देताना दिसतात. मतदानाचा पहिला टप्पा मोदींच्या हातातून निसटला व दुसऱ्या टप्प्यातही त्यांचा बेताल प्रचार कामी येईल, अशी चिन्हे नाहीत. देशात बदल होत आहे व महाराष्ट्रही त्या बदलात सहभागी होताना दिसत आहे. रामटेक, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूरचे मतदान 19 एप्रिल रोजी पार पडले. 26 एप्रिल रोजी बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, वाशीम, हिंगोली, नांदेड, परभणीचे मतदान झाले. या दोन्ही टप्प्यांत भाजप पिछाडीवर आहे.

चारशे पारच्या स्वप्नांना पहिल्या दोन टप्प्यांतच महाराष्ट्रात सुरुंग

मोदींच्या ‘चारशे पार’च्या स्वप्नांना पहिल्या दोन टप्प्यांतच महाराष्ट्रात सुरुंग लावला. पुढल्या तिन्ही टप्प्यांत यापेक्षा मोठे हादरे बसतील. पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनी प्रचारासाठी सर्वाधिक सभा महाराष्ट्रात घेतल्या. मोदी यांच्या सभांचा कोठेच प्रभाव पडला नाही व अमित शहांच्या सभांची दखल मतदारांनी घेतली नाही. “मोदींची लाट राहिलेली नाही. आता आपला आपणच संघर्ष करावा लागेल,” असे मत अमरावतीच्या भाजप उमेदवार सौभाग्यवती राणा यांनी व्यक्त केले ते खरेच आहे. मोदी-शहांचे नाव कोणी घेतले तरी लोक चिडतात असे वातावरण आज महाराष्ट्रात आहे.

मोदी कमी पडले की, पुढचा सूर अमित शहा लावतात

नरेंद्र मोदी यांचा पराभव निश्चित आहे व त्या भयातून ते विरोधकांच्या बाबतीत बेताल विधाने करीत आहेत. मोदी कमी पडले की, पुढचा सूर अमित शहा लावतात. “केंद्रात काँग्रेसची सत्ता आली तर जास्त मुले असलेल्या ‘घुसखोरां’ना संपत्तीचे फेरवाटप केले जाईल. महिलांची मंगळसूत्रे हिसकावून घेतली जातील,” असे एक विधान पंतप्रधान मोदी यांनी केले. पंतप्रधानपदावरील व्यक्तीस प्रचारात हिंदू-मुसलमान याशिवाय दुसरे मुद्दे नसावेत व ऐन प्रचारात मतांसाठी धार्मिक प्रचार करावा लागतो हे त्यांच्या मानसिक स्थितीचे प्रदर्शन. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात कोठेही संपत्तीच्या फेरवाटपाचा, मंगळसूत्राचा उल्लेख नाही. तरीही श्री. मोदी बिनधास्त खोटे बोलतात.

उद्धव ठाकरे व शरद पवार यांना पुत्रप्रेम व कन्याप्रेम नडले. त्यामुळेच त्यांचे पक्ष फुटले, असे विधान अमित शहा करतात ते कशाच्या आधारावर? स्वतःचा कंडू शमविण्यासाठी महाराष्ट्रावरील आकसापोटी मोदी-शहांनी शिवसेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेसची शकले केली, कुटुंबे फोडली. भाजपच्या राजकीय घसरणीस ताळतंत्र उरला नाही व आता शेजेवर कोणीही चालते अशी त्यांची स्थिती महाराष्ट्रात झाली. राज ठाकरे हे भाजपचे महाराष्ट्रातील नवे डार्लिंग बनले, पण उत्तर प्रदेश-बिहारात त्याचा फटका बसेल. अशोक चव्हाण, अजित पवार यांना सोबत घेतल्याने भाजपला महाराष्ट्रात फायदा होणार नाही. अजित पवार यांच्या गटास लोकसभेची एकही जागा मिळणार नाही.

बारामतीत सुनेत्रा पवार व रायगडात सुनील तटकरे यांचा दारुण पराभव होत आहे. एकनाथ शिंदे यांचे राजकीय अस्तित्वही लोकसभा निवडणुकीनंतर राहील काय? हा प्रश्न आहे. शिंदे यांच्या वाटय़ाला 16 जागा आल्या. त्यांच्या पाच खासदारांना भाजपने उमेदवारी नाकारली. खरी शिवसेना म्हणणाऱ्यांची ही अवस्था! ठाणे लोकसभा मतदारसंघावर भाजपने दावा ठोकला व शिंदे काहीच करू शकले नाहीत. उद्धव ठाकरे यांच्याबाबतीत भाजपने हे करण्याचा प्रयत्न केला. त्या प्रत्येक वेळी उद्धव ठाकरे हे खंबीरपणे उभे राहिले. अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्याकडून कोणत्याच स्वाभिमानाची अपेक्षा करता येणार नाही.

त्यामुळे सोलापुरात प्रणिती शिंदे

बारामतीत सुनेत्रा अजित पवारांचे काहीच चालणार नाही. कल्याण-डोंबिवली मतदारसंघात मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे पराभवाच्या छायेत आहेत. सातारा ‘राजां’ना सोपा नाही व कोल्हापुरात शाहू महाराजांची निवडणूक एकतर्फी होत आहे. विजयसिंह मोहिते पाटील व त्यांचे कुटुंब पुन्हा शरद पवारांच्या सोबत आले. त्यामुळे सोलापुरात प्रणिती शिंदे व ‘माढा’ मतदारसंघात राष्ट्रवादीचे धैर्यशील मोहिते विजयी होतील. भारतीय जनता पक्षाला अशा अनेक मतदारसंघांत दारुण पराभवास सामोरे जावे लागेल. महाराष्ट्रात 30 पेक्षा जास्त जागा महाविकास आघाडीस सहज मिळतील. मोदी व शहा यांच्या सभांचा आणि प्रचाराचा बार फुसकाच ठरला. कोकणात प्रत्यक्ष मोदी उभे राहिले तरी शिवसेनेचे उमेदवार जिंकतील. नारायण राणे हे रत्नागिरी-सिंधुदुर्गात किमान दोन लाख मतांनी पराभूत होतील हे आताच नक्की झाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here