Tripura News: विरोधकांना खुली ऑफर,“भाजप गंगेसारखा! डुबकी मारा आणि पापं धुऊन टाका”

Tripura News: त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा यांचे विरोधकांना आवाहन

0

अगरतला,दि.१०: Tripura News: निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेते, आमदार, खासदार पक्षांतर करतात. अनेकदा भारतीय जनता पक्षावर विरोधी पक्षातील आमदार फोडून अनेक राज्यात सत्तांतर घडवून आणल्याचा आरोप करण्यात आला. देशात कुठे ना कुठे कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या निवडणुका सुरूच असतात. अलीकडेच गुजरात, हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुका झाल्या. यात गुजरातमध्ये भाजपने ऐतिहासिक विजय मिळवला. तर, हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसने सत्ता स्थापन केली. यातच आता त्रिपुरामध्ये (Tripura Political News) विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या एका सभेत भारतीय जनता पक्ष गंगेसारखा आहे. यात डुबकी मारा आणि पापे धुऊन टाका, असे सांगत त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना थेट ऑफर दिल्याची चर्चा आहे. 

भाजपमध्ये येण्याचे आवाहन | Tripura Political News

त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा (CM Manik Saha) यांनी विरोधी पक्षातील नेत्यांना भाजपमध्ये येण्याचे आवाहन केले आहे. साहा यांनी सांगितले की, भाजप गंगा नदीसारखा आहे आणि त्यात डुबकी घेतल्याने सर्व पापांची मुक्तता होईल. जनविश्वास रॅलीचा एक भाग म्हणून दक्षिण त्रिपुरातील काकराबन येथे जाहीर सभेला संबोधित करताना साहा बोलत होते. तसेच या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपला निश्चित विजय मिळेल, असा विश्वासही साहा यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

Tripura News
मुख्यमंत्री माणिक साहा

भाजप गंगेसारखा डुबकी मारा आणि… | Tripura News

त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा म्हणाले की, जे अजूनही स्टॅलिन आणि लेनिन यांच्या विचारसरणीवर विश्वास ठेवतात त्यांना मी आवाहन करतो. त्यांनी भाजपमध्ये यावे. जर तुम्ही गंगेत पवित्र स्नान केले तर तुमची सर्व पापे धुऊन जातील. तसेच रेल्वेचे डबे अजूनही रिकामेच आहेत. रिकाम्या डब्यात बसा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वांना त्या स्थानावर घेऊन जातील जिथे आपल्याला असायला हवे, असे साहा यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, विरोधी पक्ष माकपावर निशाणा साधत साहा यांनी आरोप केला की, कम्युनिस्ट पक्षाने लोकांचे लोकशाही अधिकार दडपले आणि त्रिपुरामध्ये वर्षानुवर्षे राज्य केले. कम्युनिस्ट राजवटीत लोकशाही नव्हती. त्यांचा हिंसाचार आणि दहशतवादी डावपेचांवर विश्वास होता. दक्षिण त्रिपुरा जिल्ह्यात डाव्यांच्या राजवटीत ६९ विरोधी नेत्यांची हत्या झाली. काकराबानलाही अपवाद नव्हता जिथे अनेक राजकीय हत्या झाल्या, असा आरोप साहा यांनी केला. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here