बदनामी करण्याची धमकी देत राज्यातील बड्या मंत्र्याला मागितले 10 लाख रुपये

0

दि.29 : महाराष्ट्र सरकारमधील एका बड्या मंत्र्याला बदनामी करण्याची धमकी देत 10 लाख रुपये मागितल्याची घटना घडली आहे. एका चॅनेलमधून बोलत असल्याचे सांगत फोनवर ही धमकी देण्यात आली आहे. मुंबईतील जयहिंद चॅनेलमधून बोलत असल्याचं सांगत, एका तरुणाने महाविकास आघाडी सरकारमधील एका बड्या मंत्र्याला 10 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपीनं दहा लाख रुपये न दिल्यास बदनामी करेन, अशी धमकी दिली आहे. तसेच आरोपीनं संबंधित मंत्र्याबाबत अश्लील मजकूर देखील व्हॉट्सॲपला पाठवून बदनामीचा इशारा दिला आहे. याप्रकरणी रत्नागिरी पोलीस ठाण्यात मुंबईतील प्रदीप भालेकर याच्याविरोधात गुन्हा दाखल केलं आहे.

एका चॅनेलने या संदर्भात वृत्त दिले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी प्रदीप भालेकर याने उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत (Higher and Technical Education Minister Uday Samant) आणि त्यांचे भाऊ किरण सामंत (Kiran samant) यांना आक्षेपार्ह मजकूर पाठवून बदनाम करण्याची धमकी दिली आहे. तसेच समाजात होणारी बदनामी टाळायची असेल, तर लवकरात लवकर दहा लाख रुपये द्यावेत, अशी मागणी केली आहे. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित घटना 26 सप्टेंबर रोजी दुपारी पावणे तीनच्या सुमारास घडली आहे.

उदय सामंत यांचे स्वीय सहायक महेश सामंत यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, प्रदीप भालेकर याने किरण सामंत यांच्या मोबाइलवर फोन करत, आपण जयहिंद चॅनेल मुंबई येथून बोलत असल्याचं सांगितलं. तसेच आपल्याकडील बांधकाम कामे आपल्याला द्या, असं सांगितलं. यावेळी किरण सामंत यांनी संशयिताला त्याच्या कामकाजाबद्दल विचारलं. या गोष्टीचा राग आल्याने आरोपीनं खोट्या बातम्या करून समाज माध्यमावर बदनामी करेल, अशी धमकी दिली.

हे प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही तर आरोपीने, महेश सामंत याचे सहकारी मनीषकुमार मोरे यांच्या मोबाइलवर फोन केला तसेच मंत्री उदय सामंत यांच्याबाबत अपमानास्पद मजकूर पाठवून दहा लाख रुपयांची मागणी केली. याप्रकरणी उदय सामंत यांचे स्वीय सहायक महेश सामंत यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात मुंबईचा प्रदीप भालेकर विरोधात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here