मुंबई,दि.22: महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे (MVA) सरकार सत्तेत आल्यानंतर महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांच्या विरोधात ईडी (सक्तवसुली संचालनालय) सीबीआय चौकशी सुरू आहे. भाजपा (BJP) सत्तेचा दुरुपयोग करत असल्याचा आरोप शिवसेना व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला आहे. भाजपचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ज्यांच्यावर आरोप केले त्यांची सक्तवसुली संचालनालयाने चौकशी सुरू केली आहे.
सक्तवसुली संचालनालयाने मंगळवारी शिवसेना नेते रवींद्र वायकर यांची 8 तास चौकशी केली. वायकर हे जोगेश्वरी विधानसभा मतदार संघाचे आमदार आहेत. त्यांच्या चौकशीने एकच खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांकडून कारवाई सुरू असल्याचं दिसून येत आहे. यावरुन, महाविकास आघाडीचे नेते ही कारवाई राजकीय सूडबुद्धीने होत असल्याचा आरोप करत आहेत.
किरीट सोमैया यांनी केलेल्या गैरव्यवहाराच्या आरोपानंतर वायकर यांची चौकशी केल्याचे समजते. वायकर यांनी ईडीकडे काही कागदपत्रेही सादर केली आहेत. तसेच गरज पडल्यास त्यांना पुन्हा चौकशीला बोलावण्यात येऊ शकते, असेही ईडीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. दरम्यान, वायकर यांना नेमकं कोणत्या प्रकरणातील चौकशीसाठी बोलविण्यात आले होते, हे अद्याप सांगण्यात आले नाही. तर, वायकर यांनीही ईडीच्या चौकशीबाबत काहीही बोलण्यास नकार दिला.
ईडीकडून गेल्या काही दिवसांपासून शिवसेना नेत्यांची मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी चौकशी करण्यात येत आहे. यापूर्वी आमदार प्रताप सरनाईक, खासदार भावना गवळी, माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि आता रविंद्र वायकर यांची चौकशी करण्यात येत आहे. रविंद्र वायकर हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या जवळचे मानले जातात. तसेच, शहरातील विविध संघटनांच्या पदांवरही ते आहेत. त्यामुळे, रविंद्र वायकर यांच्या ईडी चौकशीची चांगलीच चर्चा होत आहे.