महाविकास आघाडी सरकारमधील या मंत्र्यालाही होतं क्रूझवरील ड्रग्ज पार्टीचं आमंत्रण : नवाब मलिक

0

मुंबई,दि.७: राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात नवा गौप्यस्फोट केला आहे. ड्रग्ज प्रकरणात आर्यन खान (Aryan Khan) याला अडकवण्यात आलं असून हा संपूर्ण प्रकार किडनॅपिंग आणि वसुलीचा आहे असा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. तसेच या प्रकरणात मोहित भारतीय हा मास्टरमाईंड असल्याचा दावाही नवाब मलिकांनी केला आहे.

‘कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरण हा प्रचंड मोठा कट असल्याचा पुनरुच्चार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज केला. ‘क्रूझ पार्टीत सहभागी होण्यासाठी राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री अस्लम शेख यांनाही आग्रह करण्यात आला होता. ‘उडता पंजाब’ प्रमाणे ‘उडता महाराष्ट्र’ करण्याचा हा डाव होता,’ असा गौप्यस्फोट मलिक यांनी केला.

गेल्या महिनाभरापासून ‘एनसीबी’मधील काही अधिकाऱ्यांविरोधात आघाडी उघडणाऱ्या नवाब मलिक यांनी आज या प्रकरणात आणखी काही खुलासे केले. कॉर्डेलिया क्रूझवरील ड्रग पार्टी हा खंडणीवसुलीचा खेळ होता. मोठ्या घरातील लोकांना त्यात अडकवून समीर वानखेडे यांच्या प्राइव्हेट आर्मीला वसुली करायची होती, असं मलिक यांनी सांगितलं. इतकंच नव्हे, राज्य सरकारच्या आशीर्वादानंच अशा ड्रग्ज पार्ट्या सुरू असल्याचंही भासवण्याचा कट होता, असा संशय मलिक यांनी व्यक्त केला. हे सांगताना त्यांनी मोठा खुलासा केला.

कॉर्डेलिया क्रूझवर पार्टीचं आयोजन करणारा ड्रग्ज पेडलर काशिफ खान यानं मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांना देखील पार्टीचं आमंत्रण दिलं होतं. शेख यांनी पार्टीत सहभागी व्हावं, यासाठी तो सतत आग्रह करत होता. यामागे सरकारला बदनाम करण्याचा डाव असावा. अस्लम शेख या पार्टीत गेले नाहीत, ते गेले असते तर ‘उडता पंजाब’ नंतर ‘उडता महाराष्ट्र’ असा खेळ झाला असता, असं मलिक म्हणाले. अस्लम शेख यांच्या व्यतिरिक्त अन्य कुणा मंत्र्याला या पार्टीचं आमंत्रण होतं का, अशी विचारणा पत्रकारांनी केली असता, त्याबाबत मलिक यांनी काही बोलणं टाळलं. मात्र, अस्लम शेख यांना झालेल्या आग्रहाबद्दल ते स्वत: माहिती देतील, असंही मलिक म्हणाले.

क्रूझ पार्टीवर एनसीबीनं केलेल्या कारवाईत एक स्प्रे सापडला होता. या स्प्रेच्या माध्यमातून ड्रग्ज घेतलं जात असल्याची माहिती आहे. इतकी मोठी कारवाई झाली होती, तर हा स्प्रे बनविणाऱ्या कंपनीच्या मालकाला अटक का केली गेली नाही?,’ असा सवाल मलिक यांनी केला. काशिफ खान हाच या कंपनीचा मालक आहे. तो समीर वानखेडे यांचा मित्र आहे,’ असंही त्यांनी यावेळी सांगितलं.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here