अंबरनाथ,दि.१७: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील लाऊड स्पीकरवरून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मशिदीवरील भोंगे ३ मे पर्यंत काढावेत अशी मागणी राज ठाकरेंनी केली आहे. भोंगे हा धार्मिक विषय नसून सामाजिक विषय आहे. आवाजाचा त्रास केवळ हिंदूनाच नव्हे तर मुस्लीमांनाही होत आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे भोंगे हटलेच पाहिजेत असं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सांगितल्यानंतर पक्षातील अनेक मुस्लीम कार्यकर्ते नाराज झाले. मात्र राज ठाकरेंना पाठिंबा देणारे मुस्लीम पदाधिकारीही मनसेत आहेत.
अंबरनाथ येथील मनसेचे मुस्लीम पदाधिकारी एहसामोद्दीन खान यांनी हनुमान जयंतीनिमित्त मंदिरात जात दर्शन घेतले. त्याचसोबत राज ठाकरेंच्या भोंगे हटवण्याच्या भूमिकेला त्यांनी समर्थन दिले आहे. एहसामोद्दीन खान म्हणाले की, अंबरनाथमध्ये कधीही जातीयवाद झाला नाही. शिवनगर परिसरात हनुमान मंदिरात मनसेच्या मुस्लीम पदाधिकाऱ्यांनी दर्शन घेतले. जेव्हा बाळासाहेब ठाकरे होते तेव्हा मशिदीवरील भोंगे हटवावे असं म्हटलं होतं. त्यावेळी शाबीरभाई शेख यांनी शिवसेना सोडली नाही. शाबीरभाई हे अंबरनाथमधून ३ वेळा आमदार झाले. मंत्रिपद मिळाले.
मीदेखील मनसे सोडणार नाही. राजसाहेब जे सांगतायेत ते कोर्टाचा आदेश पाळायला सांगत आहेत. त्यांचा अजाणला विरोध नाही असं त्यांनी सांगितले. तसेच राज ठाकरे जे काही बोलले ते कायद्याने पाळण्याचं सांगितले त्यात चुकीचे काही नाही. सरकारने कायद्याचे पालन केले तर कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही. राजसाहेबांना कधीच सोडणार नाही. त्यामुळे राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही असंही अंबरनाथ येथील मनसेचे एहसामोद्दीन खान यांनी सांगितले आहे.