नवी दिल्ली,दि.११: इलेक्टोरल बाँड्स प्रकरणात सुप्रीम कोर्टाने महत्वाचे निर्देश दिले आहेत. यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. इलेक्टोरल बाँड्सवरील सुनावणीदरम्यान स्टेट बँक ऑफ इंडियाला (SBI) सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. सोमवारी झालेल्या सुनावणीदरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने (SC) SBI ला उद्या (12 मार्च) पर्यंत संपूर्ण तपशील देण्याचे आदेश दिले आहेत.
सोशल मिडीया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करत राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींवर बोचरी टीका केली आहे. “नरेंद्र मोदींच्या दान व्यवसायाची पोलखोल होणार! स्विस बँकेतील काळा पैसा 100 दिवसांत परत आणण्याचे आश्वासन देऊन सत्तेवर आलेले मोदी सरकार स्वत:च्या बँकेची आकडेवारी लपवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात खाली डोके वर पाय करत आहे.”
“इलेक्टोरल बॉण्ड्स, हा भारतीय इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा ठरणार आहे. यामुळे भ्रष्ट उद्योगपती आणि सरकारचा संबंध उघड होईल आणि नरेंद्र मोदींचा खरा चेहरा देशासमोर येईल. क्रोनोलॉजी स्पष्ट आहे- देणगी द्या, व्यवसाय घ्या, देणगी द्या, संरक्षण घ्या! देणगी देणाऱ्यांवर आशीर्वादाचा वर्षाव आणि सामान्य जनतेवर कराचा बोजा, हे भाजपचे मोदी सरकार आहे,” अशी बोचरी टीका राहुल यांनी केली.