पंतप्रधानांच्या सोलापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे हे निर्देश

0

सोलापूर,दि.13: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 19 जानेवारी 2024 रोजी सोलापूर जिल्हा दौरा नियोजित आहे. हा दौरा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रत्येक शासकीय विभागाला जबाबदारी देण्यात आलेली असून ही जबाबदारी परस्परात योग्य समन्वय ठेवून पार पाडावी, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित पंतप्रधान यांच्या दौऱ्याच्या अनुषंगाने पूर्वतयारी आढावा बैठकीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे, उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर, प्रांताधिकारी विठ्ठल उदमले, रे नगर फेडरेशनचे प्रवर्तक माजी आमदार नरसय्या आडम, चेअरमन नलिनी कलबुर्गी, सचिव युसुफ शेख, अक्कलकोटचे उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावट, प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दत्तात्रय गावडे यांच्यासह अन्य संबंधित अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी आशीर्वाद पुढे म्हणाले की, पंतप्रधान यांचा सोलापूर जिल्हा दौऱ्यासाठी खूप कमी कालावधी असल्याने सर्व संबंधित विभागानी दिलेली जबाबदारी अत्यंत चोखपणे व अधिक प्रभावीपणे पार पाडावी. प्रत्येक शासकीय विभागात चांगला समन्वय राहील व दिलेली सर्व कामे गतीने पूर्ण होतील याकडे लक्ष द्यावे असेही त्यांनी सुचित केले.

पोलीस अधीक्षक सरदेशपांडे म्हणाले की पंतप्रधान महोदय यांचा प्रोटोकॉल खूप मोठा असतो व त्यांच्या सुरक्षितेची विशेष काळजी घेतली जात असते. त्यामुळे प्रत्येक शासकीय यंत्रणेतील अधिकाऱ्यांना सुरक्षा पासेस शिवाय कार्यक्रम ठिकाणी व दौऱ्याच्या अनुषंगाने आवश्यक त्या ठिकाणी परवानगी मिळावी यासाठी सर्वांनी आपले पासेस त्वरित बनवून घ्यावेत. या दौऱ्याच्या अनुषंगाने सर्वांनी चांगले सहकार्य ठेवून काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाचे आयोजक रे नगरचे प्रवर्तक माजी आमदार नरसय्या आडम यांनी कार्यक्रमाच्या अनुषंगाने रेनगर फेडरेशनच्या वतीने काही सूचना व मागण्या प्रशासनाकडे केल्या. पंतप्रधान महोदय यांचा दिनांक 19 जानेवारी रोजी च्या कार्यक्रमाची वेळ कळवावी तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी एक लाख लोकांना 500 ट्रक द्वारे आणण्याचे नियोजन असून त्यासाठी करावयाची कार्यवाही बाबत जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाकडून वेळेत माहिती मिळावी असे त्यांनी सांगितले.

प्रारंभी उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर यांनी पंतप्रधान दौऱ्याच्या अनुषंगाने प्रत्येक विभागाने करावयाच्या कामाची सविस्तर माहिती बैठकीत दिली. कार्यक्रमाचे आयोजक रे नगर फेडरेशनने करावयाची कामे, पोलीस विभागाकडील सुरक्षा आराखडा व व्यासपीठावरील व्यवस्था, अप्पर जिल्हाधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, विद्युत विभाग, विमानतळ प्राधिकरण, बीएसएनएल, आरोग्य यंत्रणा, जिल्हा परिषद आरटीओ, अन्न व औषध प्रशासन, राज्य उत्पादन शुल्क, केंद्रीय व राज्य माहिती विभाग तसेच अन्य सर्व जिल्हास्तरीय विभाग प्रमुख यांच्याकडील जबाबदारीची माहिती त्यांनी दिली. त्याप्रमाणे सर्व संबंधित विभाग प्रमुखांनी परस्परात समन्वय ठेवून कामे पार पाडावीत, असेही त्यांनी सुचित केले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here