VBA On Raj Thackeray: मदरसे आणि मशिदीच्या राज ठाकरेंच्या वक्तव्यावर वंचित बहुजन आघाडीने केली ही मागणी

0

मुंबई,दि.४: VBA On Raj Thackeray: मदरसे आणि मशिदीच्या राज ठाकरेंच्या वक्तव्यावर वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aghadi) चौकशीची मागणी केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाडव्याला शिवाजी पार्कवर जाहीर सभा घेतली होती. या सभेत राज ठाकरेंनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. राज ठाकरे यांनी मदरसे आणि मशिदीच्या बाबतीत गंभीर आरोप केले. राज ठाकरे यांनी मदरसे आणि मशिदीमध्ये समाज विघातक गोष्टी घडत आहेत, असा अतिशय गंभीर आरोप केला होता.

राज ठाकरेंनी केलेल्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने (VBA) आक्रमक भूमिका घेतली आहे. राज ठाकरे यांच्या विधानात तथ्य असेल तर महाराष्ट्र पोलिसांनी मशिदी सील कराव्यात, पण जर राज ठाकरेंच्या विधानात तथ्य आढळून आले नाही तर त्यांना पोलिसांनी बेड्या ठोकाव्यात, अशी आक्रमक भूमिका वंचितने घेतली आहे. वंचितच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांच्या नावाने प्रसिद्धीपत्रक काढून वंचितने ही मागणी केली आहे.

जाहीर सभेत राज ठाकरे यांनी मुंबई शहराच्या बकालपणाच्या मुद्द्यावर भाष्य करताना एका वेगळ्याच विषयाला हात घातला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईडी आणि आयकर खात्याला धाडी टाकायला सांगण्यापेक्षा एकदा मुंबईच्या झोपडपट्ट्यांमधील मदरशांवर धाडी टाकाव्यात. त्याठिकाणी तुमच्या हाताला ज्या गोष्टी लागतील ते पाहून तुम्हाला सर्व परिस्थिती लक्षात येईल, आपल्याला पाकिस्तानची गरजच नाही. पाकिस्तान हवाय कशाला? उद्या काही घडलं तर आतलीच परिस्थिती आवरताना नाकीनऊ येतील, इतक्या गोष्टी आतमध्ये भरल्या आहेत, असं सूचक वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं. त्यांच्या याच वक्तव्याविरोधात आता वंचितने आक्रमक भूमिका घेतली आहे.

“शिवाजी पार्क येथील गुढीपाडव्यानिमित्त झालेल्या मेळाव्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मदरसे आणि मशिदीमध्ये समाज विघातक गोष्टी घडत आहेत, असा अतिशय गंभीर आरोप केला आहे. महाराष्ट्र पोलिसांनी राज ठाकरे यांचे स्त्रोत तपासून ज्या मशिदीत अथवा मदरशांमध्ये समाजविघातक कृत्य घडत आहेत तेथे कसून चौकशी करावी. जर काही तथ्य आढळल्यास मशिदी सील करुन जबाबदार मशिद/मदरसा समितीवर कडक कायदेशीर कारवाई करावी”

“परंतु जर या वक्तव्यामध्ये काहीही तथ्य आढळून आले नाही तर समाजामध्ये दहशत व विद्वेष पसरविण्याच्या आरोपाखाली राज ठाकरे यांच्यावर यु ए पी ए अंतर्गत गुन्हा दाखल करून राज ठाकरेंना बेड्या ठोका”, असं वंचितच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी म्हटलं आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here