मुंबई,दि.15: राष्ट्रवादी आमदार अपात्र प्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिला आहे. अजित पवार यांनी बंड करत राष्ट्रवादी पक्ष व चिन्हावर दावा केला होता. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकालाचे वाचन केले. राहुल नार्वेकर यांनी दोन्ही गटातील आमदार पात्र ठरवले आहे. राहुल नार्वेकर यांनी सर्व याचिका डिसमिस केल्या आहेत. त्यांनी शरद पवार गटाच्या सर्व याचिका फेटाळल्या आहेत.
निवडणूक आयोगाने अजित पवारांच्या बाजूने निकाल देत चिन्ह आणि राष्ट्रवादी पक्षाचं नाव त्यांना दिले. मात्र, आता आमदार अपात्रता निर्णय सुद्धा अजित पवारांच्याच बाजूने जाणार का? याचीच चर्चा रंगली होती. नार्वेकर यांनी अजित पवार गटाच्याबाजूने निर्णय दिला आहे. अजित पवार गटाचे सर्व 41 आमदार पात्र असल्याचा निर्णय नार्वेकर यांनी दिला आहे.
राहुल नार्वेकर निकालात म्हणाले, अजित पवार आणि शरद पवार या दोन गटातील हा पक्षांतर्गत वाद आहे. त्यामुळे कुणीही पक्ष सोडलेला नाही, परिणामी दहाव्या सूचीनुसार कोणावर अपात्रतेची कारवाई करता येत नाही.
शरद पवार यांच्या मनाविरोधात जाणं म्हणजे पक्ष सोडणं नाही. पक्षामध्ये मतभेद असतात. पक्षांतर्गत नाराजी म्हणजे विधिमंडळ पक्षात नाराजी असू शकत नाही. तसेच पक्षातील मतभेद म्हणजे कायद्याचा भंग असू शकत नाही, असं महत्त्वाचं निरीक्षण राहुल नार्वेकर यांनी नोंदवलं.
अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला. निवडणूक आयोगापाठोपाठ विधानसभा अध्यक्षांचा निकाल दिला आहे. अजित पवार गट हा मूळ राष्ट्रवादी पक्ष असल्याचे नार्वेकर म्हणाले. अजित पवार गटाकडे 53 पैकी 41 आमदार असून अजित पवार गटाचे सर्व 41 आमदार पात्र असल्याचा निकाल नार्वेकर यांनी दिला. शरद पवार गटाची मागणी नार्वेकर यांनी फेटाळली आहे.
अगदी शिवसेनेच्या निकालाप्रमाणेच नार्वेकरांनी राष्ट्रवादी आमदार प्रकरणाचा निकाल दिला. पक्षघटना, नेतृत्वरचना आणि विधिमंडळ संख्याबळ लक्षात घेऊन निर्णय दिल्याचंही राहुल नार्वेकर यांनी सांगितलं.