मालवाहतूक व प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांबाबत देण्यात आले हे निर्देश

0

सोलापूर,दि.8: भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा कार्यक्रम जाहीर केलेला असून या अंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी दिनांक 7 मे 2024 रोजी मतदान होणार आहे. तरी या कालावधीत सोलापूर जिल्ह्यात कर्नाटक राज्यातून कोणत्याही प्रकारे अवैध दारू येणार नाही व येथून कर्नाटक राज्यात जाणार नाही यासाठी दोन्ही राज्यातील उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्यांनी परस्परांत समन्वय ठेवून आंतरराज्य मालवाहतूक व प्रवासी वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांची दोन्ही बाजूकडील चेक पोस्टवर कसून चौकशी करावी, असे निर्देश राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पुणे विभागीय कार्यालयाचे उपायुक्त सागर धनगर यांनी दिले.

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने महाराष्ट्र व कर्नाटक राज्याच्या उत्पादन शुल्क विभागाची आंतरराज्य समन्वय बैठक सोलापूर नियोजन भवन येथील सभागृहात झाली यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपायुक्त श्री. धोमकर मार्गदर्शन करत होते. यावेळी विजयपुरा जिल्ह्याचे उपायुक्त शिवलिंगप्पा बनाटी, अधीक्षक जगदीश इनामदार, गुलबर्गा जिल्ह्याच्या उपायुक्त आफरीन सय्यद, अधीक्षक एन.सी. पाटील, उपअधीक्षक होनप्पा ओलेकर, सलगरे, निरीक्षक भिमन्ना राठोड, बी दौलतराय, बसवराज कित्तूर तसेच सांगली जिल्ह्याचे अधीक्षक प्रदीप पोटे, सोलापूर जिल्ह्याचे उपअधीक्षक संजय पाटील, निरीक्षक नंदकुमार जाधव, जगन्नाथ पाटील, सचिन भवड, दुय्यम निरीक्षक सौरभ भोसले, समाधान शेळके, सुखदेव सिद, सुरेश झगडे, शिवकुमार कांबळे, मानसी वाघ, सचिन गुठे तर धाराशिव जिल्ह्याचे निरीक्षक पवन मुळे व राहुल बांगर हे अधिकारी उपस्थित होते.

विभागीय उपायुक्त धोमकर पुढे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्हीही राज्यात आदर्श आचारसंहितेचे तंतोतंत पालन झाले पाहिजे. या निवडणुका निर्भय व खोल्या वातावरणात होण्यासाठी महाराष्ट्र व कर्नाटक राज्य उत्पादन शुल्क विभागाने परस्परात समन्वय ठेवून अवैध दारू विक्री करणाऱ्या विरुद्ध संयुक्तपणे मोहीम उघडली पाहिजे. यासाठी दोन्ही राज्यात सीमावर्ती भागातील चेक पोस्ट द्वारे अंतरराज्य मालवाहतूक व प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांची अत्यंत सूक्ष्मपणे तपासणी करावी. तसेच अन्य वाहनांचीही कसून चौकशी करून एक ही वाहनातून अवैध दारू वाहतूक होणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

महाराष्ट्र व कर्नाटक उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारू तस्करी करणाऱ्याच्या माहितीचे संकलन करून परस्परांना द्यावी. सीमावर्ती भागांमध्ये सामूहिक मोहिमा राबवणे, अवैध दारू साठवणूक ठिकाणे व हातभट्टी ठिकाणांची गोपनीय माहिती काढून त्यावर कारवाई करणे, सीमेवरील दारू दुकानांच्या दारु विक्री व्यवहारांवर कठोर नियंत्रण ठेवावे अशा सूचना धोमकार यांनी दिल्या.

यावेळी गुलबर्गा व विजयपुरा जिल्ह्यातील विभागीय उपायुक्तांनीही आचारसंहिता कालावधीत दोन्ही राज्यातील अधिकाऱ्यांनी परस्परांमध्ये समन्वय राखून व एकमेकांच्या संपर्कात राहून अवैध दारूची वाहतूक व विक्री होणार नाही याबाबत पुरेपूर दक्षता घेणे बाबत सर्व अधिका-यांना मार्गदर्शन केले.

सोलापूर व माढा मतदारसंघासोबतच कर्नाटक राज्यातील गुलबर्गा व विजयपुरा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूकीकरिता 7 मे रोजी मतदान होत असल्याने त्या अनुषंगाने मतदान कालावधी संपण्याच्या 48 तास पूर्वीपासून दारु दुकाने बंद ठेवण्याबाबत सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी ड्राय डे आदेश निर्गमित केले आहे. त्याच अनुषंगाने कर्नाटक राज्यातही ड्राय डे आदेश काढावेत अशी मागणी सोलापूर उत्पादन शुल्क अधीक्षक नितीन धार्मिक यांनी केली.

प्रारंभी बैठकीचे प्रास्ताविक धार्मिक यांनी करून लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारूविरुद्ध केलेल्या कारवाईबाबत सादरीकरण केले.       


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here