सोलापूर,दि.५: माढा लोकसभा मतदार संघात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. भाजपाने विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना भाजपाने माढा लोकसभेसाठी उमेदवारी दिल्याने भाजपाचे धैर्यशील मोहिते पाटील नाराज आहेत. धैर्यशील मोहिते पाटील यांनी माढ्यातून उमेदवारी मागितली होती. मात्र भाजपाने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली.
रणजितसिंह निंबाळकर यांना पुन्हा उमेदवारी दिल्याने नाराज असलेल्या अकलूजच्या मोहिते-पाटील घराण्यातील धैर्यशील मोहिते पाटील यांनी बुधवारी रात्री उशीरा मुंबईत शरद पवारांची भेट घेतली. सिल्व्हर ओक या शरद पवारांच्या निवासस्थानी झालेल्या या भेटीत धैर्यशील यांच्या शरद पवार गटातील प्रवेशाबाबत चर्चा झाल्याचे समजते.
अशातच अजित पवार गटाचे नेते रामराजे निंबाळकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. शरद पवार गटाकडून रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू संजीवराजे निंबाळकर किंवा धैर्यशील मोहिते पाटील यांच्यापैकी एकाला उमेदवारी दिली जाण्याची शक्यता असल्याची माहिती समोर येत आहे.
रामराजे निंबाळकर आणि धैर्यशील मोहिते पाटील आणि इतर महत्त्वाच्या नेत्यांच्या बैठकाही पार पडल्या होत्या. या नेत्यांनी आपल्या पक्षश्रेष्ठींना भेटून नाराजीदेखील व्यक्त केली. पण तरीही उमेदवार बदलण्याचा निर्णय न झाल्याने आता माढ्यात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे.
माढा लोकसभेची जागा महाविकास आघाडीत राष्ट्रवादी शरद पवार गटाला सुटण्याची शक्यता आहे. शरद पवार गट या जागेतून धैर्यशील मोहिते पाटील किंवा संजीवराजे निंबाळकर यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे.