सांगली,दि.२८: राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी माकडांचं आपल्याला काहीच करता येणार नाही असे म्हटले. एका ग्रामस्थानं गावात माकडांचा उच्छाद असल्याची तक्रार जयंत पाटील यांच्यासमोर मांडली होती, जयंत पाटलांच्या मिश्किल टिप्पणी करताच उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला. हनुमान चालीसा पठणाच्या मुद्द्यावरून सध्या राज्यातलं राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे.
खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) हे दाम्पत्य नागपुरात दाखल झालं. त्यांनी इथल्या मंदिरात हनुमान चालीसा पठण केलं. त्यानंतर ते अमरावतीच्या दिशेने मार्गस्थ झाले. हनुमान चालीसा पठण हा आंदोलनाचा देखील मार्ग म्हणून स्वीकारला जात असताना दुसरीकडे या मुद्द्यावरून राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांच्या मिश्किल स्वभावानुसार केलेल्या टिप्पणीचा व्हिडीओ व्हायरल होऊ लागला आहे. यावेळी जयंत पाटील यांनी त्यांच्या लहानपणीची एक आठवण देखील सांगितली.
सांगलीत गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांशी संवाद साधताना घडलेल्या या किश्श्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. यावेळी एका ग्रामस्थानं गावात माकडांचा उच्छाद असल्याची तक्रार जयंत पाटील यांच्यासमोर मांडल्यानंतर त्यावर जयंत पाटील यांनी मिश्किल टिप्पणी करताच उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला.
आसपासच्या एका गावातील एका ग्रामस्थानं जयंत पाटील यांच्यासमोर माकडांचा त्रास होत असल्याची तक्रार मांडली. “या भागात मोठमोठी झाडं आहेत. पण इथे माकडं दिसत नाहीत आपल्याला. आमच्याकडे झाडं कमी असूनही आमच्या घरांवर एवढी माकडं आहेत की आमच्या घरांवर कौलं राहिलेली नाहीत. त्यामुळे पिकं राहात नाहीत”, असं या ग्रामस्थानं जयंत पाटलांना सांगितलं.
मात्र, यावर जयंत पाटील यांनी माकडांचं आपल्याला काहीच करता येणार नाही, असं सांगताना केलेली मिश्किल टिप्पणी उपस्थितांमध्ये हशा पिकवून गेली. “रामटेकला मंदिरात मी लहानपणी गेलो होतो. तिथे माकडानं माझ्या हातातलं केळ काढून नेलं होतं. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. आता ४०-५० वर्षांत ती अजून वाढली असतील”, अशी आठवण पाटील यांनी यावेळी सांगितली.
हनुमान चालीसा
राज्यात हनुमान चालीसाच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर यावेळी जयंत पाटील यांनी खोचक प्रतिक्रिया दिली. “आता तुम्ही कौलाच्या घराच्या जागेवर सिमेंट-काँक्रीटचं घर बांधण्याची जिद्द ठेवा. कौलाचा आणि माकडाचा त्रास बंद होईल. पण माकडाला काही करू शकत नाही आपण. तो हनुमानाचा अवतार आहे. आपण आता हनुमान चालीसा म्हणतो. आणि तुम्ही म्हणताय ते आपल्याला त्रास देतायत”, असं जयंत पाटील यावेळी म्हणाले.