शिवसेना नेते संजय राऊत यांना दिलासा नाहीच, फैसला आता या तारखेला

0

मुंबई,दि.2: पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात कोठडीत असलेले शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांना दिलासा मिळाला नाहीच. पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज पुन्हा एकदा सुनावणी झाली. न्यायालयाने संजय राऊत यांच्या कोठडीमध्ये तुर्तास वाढ केली आहे. मात्र, जामीन अर्जाचा निर्णय राखून ठेवला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 9 नोव्हेंबरला होणार आहे. त्याच दिवशी राऊतांना जामीन मिळणार की नाही याचा फैसला होणार आहे.

दरम्यान, संजय राऊत हे कथित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी न्यायलयीन कोठडीत आहेत. संजय राऊत यांनी जामीन मिळण्यासाठी कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. यावर निर्णय देताना कोर्टाने सुनावणी पुढे ढकलली. आता 9 नोव्हेंबरला त्यांच्या जामीन याचिकेवर सुनावणी होणार आहे.

संजय राऊतांच्या जामिनासंदर्भात ईडीने आज लेखी उत्तर सादर केले. जामिनावरील निकाल न्यायालयाने राखून ठेवला आहे. दरम्यान, संजय राऊतांना कथित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीनं अटक केली होती. विशेष म्हणजे प्रविण राऊत आणि संजय राऊत यांच्या जामीनावर एकाच दिवशी 9 नोव्हेंबरला कोर्ट निर्णय देणार आहे. आजच्या सुनावणीवेळी त्यांचे कुटूंबदेखील कोर्टात हजर होते.

मुंबईमधील गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा भूखंड आहे. पत्राचाळ परिसरातील 672 कुटुंबीयांचा पुनर्विकास करण्यासाठी 2008 मध्ये मे. गुरू-आशीष कन्स्ट्रक्शन्सची रहिवाशांनी नियुक्ती केली. मात्र त्यांनी या जागेचा काही भाग खासगी बिल्डरांना विकला. प्रवीण राऊत यांच्यावर पत्राचाळमध्ये राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. आशिष कन्स्ट्रक्शनला पत्राचाळमधील तीन हजार फ्लॅट बांधकाम करून 672 फ्लॅट भाडेकरूला द्यायचे होते. उर्वरित फ्लॅट म्हाडा आणि विकासक यांच्यात वाटून घ्यायचे होते. मात्र 2010 मध्ये प्रवीण राऊत यांनी गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे काही शेअर एचडीआयएलला विकले.

या प्रकरणातील पैसा नेमका कुठे गेला यासंदर्भात ईडीने केलेल्या तपासामध्ये प्रवीण राऊत यांच्या नावाने एचडीआयएलमधून 100 कोटी वळवण्यात आल्याचं समोर आलं. 2010 मध्ये या आर्थिक घोटाळ्यातील 55 लाखांची रक्कम ही प्रवीण राऊत यांची पत्नी माधुरी राऊत यांच्या खात्यावरुन वर्षा राऊत यांच्या खात्यावर वळवण्यात आली. वर्षा राऊत या संजय राऊत यांच्या पत्नी आहेत. वर्षा यांनी ही रक्कम दादरमधील फ्लॅट घेण्यासाठी वापरल्याचा दावा ईडीने केला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here