दि.19: Shivsena-AIMIM मध्ये काहीच फरक नाही अशी टीका भाजपाचे आमदार अतुल भातखळकर (atul bhatkhalkar) यांनी केली आहे. औरंगाबादमध्ये AIMIMचे खासदार इम्तियाज जलील (imtiyaz jaleel) आणि राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (rajesh tope) यांच्यात एक बैठक झाली असल्याचं वृत्त समोर आलं आहे. या बैठकीत इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीसोबत येण्याची ऑफर दिली असल्याची माहिती समोर आली आहे.
AIMIM महाविकास आघाडीला (mahavikas aghadi) आघाडीचा प्रस्ताव दिला आहे. त्यामुळे संजय राऊत काय म्हणतात याला काही अर्थ नाही. एमआयएम शिवसेनेसोबत आघाडीचा प्रस्ताव देते यातच शिवसेनेचं खरं स्वरुप उघड झालं आहे. ही शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना राहिलेली नाही. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंची तथाकथित सेक्युलर नव शिवसेना आहे. ही शिवसेना राहिली नसून हिरवी सेना झाली आहे. आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बरोबर मुस्लिम लांगूलचालन करण्यात शिवसेना अग्रेसर आहे. त्यामुळे त्यांनी एमआयएमशी आघाडी केली काय आणि नाही केली काय आता एमआयएम आणि शिवसेनेत गुणात्मक दृष्ट्या काही फरक राहिलेला नाही, अशी टीका भाजपचे नेते अतुल भातखळकर (atul bhatkhalkar) यांनी केली आहे. ते मीडियाशी बोलत होते.
शिवसेनेने गेल्या अडीच वर्षात केवळ मुख्यमंत्रीपदाच्या आणि मुलाला कॅबिनेट मंत्री करण्याच्या मोहापायी हिंदुत्व, मराठीबाणा या सर्वांना तिलांजली दिली. आजही औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करण्यासाठी तोंडातून चकार शब्द काढत नाहीत. त्या शिवसेनेकडून दुसरी अपेक्षा काय करणार? असा सवाल अतुल भातखळकर यांनी केला आहे.
एकाच माळेचे मणी
एमआयएमने कुणाला ऑफर दिली माहीत नाही. नवाब मलिकसारखे लोकं राष्ट्रवादीत आहेत. त्यांचा आजही राजीनामा घेतला जात नाही. दाऊदबरोबर त्यांचे आर्थिक हितसंबंध असल्याचं प्राथमिकदृष्ट्या सिद्ध होऊनही शिवसेना किंवा मुख्यमंत्री त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढण्यास तयार नाहीत. त्यामुळे मला असं वाटतं की आघाडीतील सर्व पक्ष आणि एमआयएम, मुस्लिम लीग एकाच रांगेतील पक्ष आहेत. त्यामुळे आमच्या दृष्टीने शिवसेनेने त्यांच्यासोबत युती केली काय आणि नाही केली काय काही फरक पडत नाही. कारण सर्व एकाच माळेचे मणी झाले आहेत. आम्ही आमचा हिंदुत्वाचा आणि राष्ट्रवादाचा अजेंडा महाराष्ट्रात पुढे घेऊन जात आहोत आणि तसाच पुढे नेणार आहोत, असंही ते म्हणाले.
टोपे-जलील भेटीतील चर्चा काय?
आरोग्यमंत्री राजेश टोपे हे काल खासदार जलील यांच्या भेटीसाठी औरंगाबादेत आले होते. जलील यांच्या मातोश्रींचे काही दिवसांपूर्वी निधन झाल्यामुळे त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी टोपे औरंगाबादमध्ये आले होते. त्यावेळी उत्तर प्रदेशात तुमच्यामुळे भाजप जिंकली, असा आरोप एमआयएमवर करण्यात आला. हा आरोप भविष्यात लावला जाऊ नये, म्हणून आम्ही महाविकास आघाडीत शामिल होण्याचा प्रस्ताव देतोय, असे खासदार जलील म्हणाले. तसेच महाविकास आघाडीवर खोचक टीका करताना ते म्हणाले, ‘ तुमच्या तीनचाकी रिक्षाला एक चाक जोडा, मोटर कार करा, बघा कशी चालतेय..’