मुंबई,दि.7: Yashwant Jadhav: आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष आणि शिवसेना नेते यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्या माझगाव येथील घरावर धाड टाकली होती. यशवंत जाधव यांच्या डायरीची चर्चा राज्यात जोरदार सुरु आहे. आयकर विभागाच्या धाडीमध्ये मिळालेल्या यशवंत जाधव यांच्या डायरीमध्ये ‘मातोश्री’ शिवाय अन्य दोघांची नावे आहेत. त्यातील एकाचा उल्लेख केबलमॅन असून दुसरी व्यक्ती महिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यशवंत जाधव यांच्यासोबत आता इतरांच्याही अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
यशवंत जाधव यांच्या डायरीत 2 कोटी रुपये आणि 50 लाखांच मातोश्रीला दिल्याचा उल्लेख होता मात्र आणखी दोन नावांचाही उल्लेख असल्याची माहिती आता समोर आल्याने खळबळ उडाली आहे. जाधव यांच्या डायरीत शिवसेनेच्या आणखी दोन नेत्यांची नावं आहेत. त्यातील एकजण मंत्रीपदावर आहेत तर दुसऱ्या महिला नेत्या आहेत. या महिला नेत्या मुंबई महापालिकेत चर्चेत असतात, अशी माहिती सूत्रांनी दिली.
आयकर विभाग करणार चौकशी
जाधव यांच्या डायरीत केबलमॅन अशा एका नावाचा उल्लेख आहे. या नावापुढे त्यांनी 75 लाख, 25 लाख आणखी 25 लाख असे एक कोटी 25 लाख दिल्याचा उल्लेख केला आहे. तर दुसरीकडे, आणखी एक नाव M-TAI असं लिहिलेलं असून त्यापुढे 50 लाख रुपये दिल्याचा उल्लेख आहे. या दोन लोकांविषयी आयकर विभागाकडून माहिती मिळवली जात आहे. लवकरच या दोघांनाही आयकर विभागाकडून समन्स बजावले जाण्याची शक्यता आहे.
जाधव यांच्या डायरीतले केबलमॅन आणि M-TAI असा उल्लेख असणारे हे व्यक्ती कोण याबद्दल अद्याप समजू शकले नाही. मात्र, या नावावरून वेगवेगळे तर्क लढवले जात आहेत.
मातोश्रीचे नाव
मागील महिन्यात यशवंत जाधव यांच्या घरावर त्यांच्या संपत्तीवर सोबत त्यांच्या निकटवर्तीयांच्या घरी आयकर विभागाने धाड टाकल्या. या आयकर विभागाच्या धाडीनंतर यशवंत जाधव यांच्या डायरीची सगळ्यात जास्त चर्चा सुरू आहे. या डायरीमध्ये यशवंत जाधव यांच्या हिशोबाच्या नोंदी आहेत. त्यात दोन कोटी रुपये आणि पन्नास लाख रुपयांच्या घड्याळीची नोंद मातोश्रीच्या नावे आहे. मात्र नोंद मातोश्री या आपल्या आई असल्याचा दावा यशवंत जाधव यांनी केला असल्याची आयकर विभागातील सूत्रांची माहिती आहे. आता या मातोश्रीच्या नोंदीवर राजकीय प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली.