रंगपंचमीचे रंग अनेक असले तरी निवडणूक निकालाच्या दिवशीचा रंग भगवाच असेल

0

सोलापूर,दि.३०: कोणीही काहीही टीका केली तरी सोलापूरकर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाच्याच पाठीशी उभे आहेत. रंगपंचमीचे रंग अनेक असले तरी ४ जून रोजी निवडणूक निकालाच्या दिवशीचा रंग भगवाच असेल. या निवडणुकीत विजयाचा गुलाल आम्हीच उधळणार, असा विश्वास भाजपा उमेदवार आमदार राम सातपुते यांनी शनिवारी व्यक्त केला.

रंगपंचमीनिमित्त आमदार राम सातपुते यांनी पाणीवेस तालीमच्या रंगोत्सवात सहभागी होऊन कार्यकर्त्यांसोबत रंगपंचमी साजरी केली. यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे, पाणीवेस तालीमचे प्रमुख चंद्रकांत वानकर, माजी नगरसेवक विक्रांत वानकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रारंभी पाणीवेस तालीमच्या गणरायाची आणि छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या मूर्तीची पूजा आमदार राम सातपुते यांच्या हस्ते करण्यात आली. यानंतर पाणीवेस तालीमचे प्रमुख चंद्रकांत वानकर, माजी नगरसेवक विक्रांत वानकर यांच्या हस्ते आमदार राम सातपुते यांचा सन्मान करण्यात आला.

आमदार राम सातपुते म्हणाले, सोलापूरमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ, मोठ्या प्रमाणावर रोजगार, पुरेसे पाणी, एमआयडीसीचे विस्तारीकरण, आयटी पार्क, गारमेंट पार्क होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. सोलापूरकरांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. विरोधी पक्षाच्या उमेदवार माझ्यावर टीका करत आहेत. त्यांच्या पक्षाच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘मौत का सौदागर’ म्हटले होते. मी तर सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्ता आहे.

त्यांनी कितीही पातळी सोडून टीका केली तरी आम्ही विकासाचीच चर्चा करणार. इतकी वर्षे सत्ता उपभोगून देखील आजवर सोलापूरचा विकास का नाही झाला ? याचे उत्तर काँग्रेसने जनतेला द्यावे असेही आमदार राम सातपुते याप्रसंगी म्हणाले.

यावेळी भाजपचे शहर अध्यक्ष नरेंद्र काळे, पाणीवेस तालीमचे प्रमुख चंद्रकांत वानकर, माजी नगरसेवक विक्रांत वानकर, सुभाष पवार, महादेव पवार, प्रसाद झुंजे, पंकज काटकर आदी उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here