सरकार बनविण्यासाठी एकत्र आल्यावर दुधात साखर मिसळावी तसे तिन्ही पक्ष एकत्र मिसळून गेले आहोत : आदित्य ठाकरे

0

अहमदनगर,दि.३१: संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथे आयोजित करण्यात आलेल्या दंडकारण्य अभियानाच्या आनंद मेळाव्यात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे संबंध साखरेइतके गोड आहेत असे सांगत जोरदार फटकेबाजी केली. ‘महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांचे एकमेकांशी साखरेएवढे गोड संबंध आहेत. सरकार बनविण्यासाठी एकत्र आल्यावर दुधात साखर मिसळावी तसे तिन्ही पक्ष एकत्र मिसळून गेले आहोत. या तीन पक्षांत शहरी आणि ग्रामीण भागात कामाचा चांगला अनुभव असलेले नेते आहेत. त्यामुळे क्रिकेट टीम प्रमाणे ‘बेस्ट ऑफ इलेव्हन’ अशी ही टीम आहे,’ अशी उपमा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी महाविकास आघाडीला दिली.

‘वातावरण चांगले असले की विकासाला वाव मिळतो. महाविकास आघाडीच्या सकारमधील तिन्ही पक्षांत विश्वासाचे वातावरण आहे. मुळात शिवसेनेचा स्वभावच असा आहे की, आम्ही पोटात एक आणि ओठात एक असं करत नाही. कुणाबद्दल वाईट विचार तर मुळीच बाळगत नाही. आमचे मन साफ आहे. त्यामुळे आधीपासूनच सर्वांशी संबंध चांगले होते आणि त्याचाच उपयोग झाला व आम्ही एकत्र आलो’, असे आदित्य म्हणाले. मंत्री झाल्यापासून ज्येष्ठांकडून शिकतो आहे. अधिवेशनातही ज्येष्ठांचे मार्गदर्शन मिळते.

या कार्यक्रमास महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, खासदार सदाशिव लोखंडे, दंडकारण्य अभियानाचे मुख्य प्रवर्तक आमदार डॉ. सुधीर तांबे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे उपस्थित होते. सरकारमधील तिन्ही पक्षांच्या नेत्यांचे कौतुक करताना आदित्य ठाकरे यांनी बाळासाहेब थोरात यांचे कौतुक केले. थोरात यांचे सुरुवातीपासूनच मार्गदर्शन मिळत आले आहे आणि त्याच उद्देशाने मी आज येथे आल्याचे आदित्य यांनी सांगितले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here