नवी दिल्ली,दि.25: चोरांनी चक्क केली रेल्वे इंजिनची चोरी उघडकीस आली आहे. भुयार खोदून रेल्वे इंजिनची चोरी केली आहे. आतापर्यंत बँकेत, घरात, दुकानात चोरी झाल्याचे ऐकले, पाहिले असेल. तसेच दुचाकी गाडी, चार चाकी गाडी चोरी झाल्याचे ऐकले व पाहिले असेल. पण कधी रेल्वे इंजिनची चोरी झाल्याचे ऐकले नसेल. भारतासारख्या खंडप्राय देशामध्ये नागरिकांच्या सोयीसाठी रेल्वेचं विस्तीर्ण जाळं तयार करण्यात आलेलं आहे. भारतीय रेल्वे देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत जाऊन पोहचली आहे. आजही लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी नागरिक रेल्वेला प्राधान्य देतात. रेल्वेतून प्रवास करताना बोगीच्या आतमध्ये किंवा स्टेशनवर विविध सूचना लिहिलेल्या तुम्ही नक्कीच पाहिल्या असतील.
‘रेल्वेची संपत्ती तुमचीच संपत्ती आहे. कृपया तिची काळजी घ्या’, अशा कितीतरी सूचना बोगीच्या आतमध्ये ठिकठिकाणी लिहिलेल्या असतात. या सूचना बिहारमधील काही चोरट्यांनी जास्तच गांभीर्यानं घेतल्याचं दिसत आहे. या चोरट्यांनी रेल्वे आपली स्वत:चीच संपत्ती असल्याप्रमाणे रेल्वेच्या इंजिनासह अनेक पार्ट्स चोरण्याचा धडाका सुरू केला आहे. एका घटनेमध्ये तर रेल्वे इंजिनच्या चोरीसाठी चोरट्यांनी बरौनी ते मुझफ्फरपूरपर्यंत एक भुयार खोदल्याचं उघड झालं आहे.

बरौनी ते मुझफ्फरपूर हे अंतर जवळपास 100 किलोमीटर आहे. बारगी पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. पोलिसांनी गुरुवारी सांगितलं की, लुटारूंच्या अनेक टोळ्या बिहारमध्ये डिझेल, जुन्या ट्रेनची इंजिन चोरी आणि स्टीलचे पूल चोरत आहेत. त्यामुळे पोलिसांची झोप उडाली आहे. गेल्या आठवड्यात एका टोळीने बरौनी येथील गरहारा यार्डमध्ये दुरुस्तीसाठी आणलेल्या ट्रेनचं संपूर्ण डिझेल इंजिन चोरून नेलं.
पोलिसांनी एका चोरीच्या घटनेबाबत तिघांना ताब्यात घेतल्यानंतर ही बाब समोर आली. चौकशीदरम्यान त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनंतर, पोलिसांनी मुझफ्फरपूरच्या प्रभात कॉलनीमध्ये असलेल्या एका भंगार गोदामातून इंजिनचे सुटे भाग असलेली 13 पोती जप्त केले. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, ‘याहून आश्चर्याची गोष्ट म्हणजे आम्हाला यार्डाजवळ एक बोगदा सापडला. ज्यातून चोरटे यायचे आणि इंजिनचे पार्ट पोत्यात भरून घेऊन जात.