मुंबई,दि.21: मुंबईतील धारावी येथील मेहबूब-ए-सुबानिया मशिदीचा बेकायदेशीर भाग तोडण्यावरून तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. परिसरात तणाव पसरला आहे. हा बेकायदा भाग पाडण्यासाठी बीएमसीची (BMC) टीम आली होती मात्र जमावाने गोंधळ घातला. लोक रस्त्यावर बसून आंदोलन करत आहेत. कारवाईसाठी आलेल्या पालिकेच्या वाहनासह अन्य काही वाहनांचीही तोडफोड करण्यात आली.
परिस्थिती पाहता घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. धारावीतील परिस्थिती अजूनही तणावपूर्ण आहे. बीएमसीच्या अधिका-यांसह पोलीस अधिकारी मुस्लीम समाजाच्या नेत्यांशी चर्चा करत आहेत.
मुंबईतील धारावी येथील 90 फूट रोडवरील 25 वर्षे जुनी सुभानिया मशीद बीएमसीने अनधिकृत ठरवली होती आणि ती आज पाडली जाणार आहे. बीएमसी अधिकाऱ्यांच्या कारवाईपूर्वीच काल रात्रीपासून मुस्लिम समाजाच्या लोकांनी रस्त्यावर येऊन संपूर्ण रस्ता अडवला. ही मशीद खूप जुनी असल्याचे मुस्लिम समाजाचे लोक सांगतात.
काँग्रेस खासदारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली
मुस्लिम समाजातील लोकांचे म्हणणे आहे की, ही मशीद खूप जुनी असून तिच्यावर कारवाई चुकीची आहे. मुंबई उत्तर मध्यचे खासदार प्रा. वर्षा गायकवाड म्हणाल्या, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांनी भेट घेतली आणि धारावीतील मेहबूब-ए-सुबानिया मशिदीला बीएमसीने दिलेल्या नोटीसबाबत लोकांच्या भावना जाणून घेतल्या.
मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा झाल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले. संबंधित अधिकाऱ्यांशी बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले आणि तोडण्याची प्रक्रिया थांबविण्याचे आश्वासन दिले.