पुणे,दि.1: अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. पुण्यातील वानवडी परिसरात शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी घटना घडली आहे. पुण्यातील (Pune) वानवडी परिसरात एका शिक्षकाने शिकवणीसाठी येणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
गेल्या तीन महिन्यांपासून नराधम आरोपी पीडित मुलीचं लैंगिक शोषण करत होता. आरोपीच्या सततच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडित मुलीने संबंधित प्रकार आपल्या आईला सांगितला आहे. मुलीवर झालेल्या अत्याचाराची कहाणी ऐकून पीडितेच्या आई वडिलांना देखील धक्का बसला आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने पुण्यातील वानवडी पोलीस ठाण्यात जात 52 वर्षीय नराधम शिक्षकाविरोधात फिर्याद दाखल केली आहे. वानवडी पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचारासह विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपी शिक्षकाला बेड्या (Accused teacher arrested) ठोकल्या आहेत.
संजय रमेश शर्मा असं अटक केलेल्या 52 वर्षीय शिक्षकाचं नाव असून तो पुण्यातील वानवडी परिसरातील रहिवासी आहे. आरोपी शिक्षक खासगी शिकवणी घेतो. तर 15 वर्षीय पीडित मुलगी गेल्या काही महिन्यांपासून आरोपी शिक्षकाकडे शिकवणीसाठी येत होती. दरम्यान, 3 ऑगस्ट रोजी आरोपी शिक्षक पीडितेला इमारतीच्या छतावर घेऊन गेला होता. याठिकाणी आरोपीनं पीडितेशी जबरदस्ती करत तिच्यावर बलात्कार केला.
घाबरलेल्या पीडित मुलीने घटनेची वाच्यता कुठेही केली नाही. यामुळे आरोपी शिक्षकाची देखील हिंमत वाढली. 3 ऑगस्ट रोजीच्या घटनेनंतरही आरोपीनं पीडितेला अनेकदा छतावर घेऊन जात तिच्यावर बलात्कार केला आहे. 3 ऑगस्ट ते 29 ऑक्टोबरपर्यंत जवळपास तीन महिने आरोपी शिक्षक पीडित मुलीचं लैंगिक शोषण करत होता. आरोपी शिक्षकाच्या सततच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडितेनं तिच्यासोबत होणाऱ्या अत्याचाराची माहिती आपल्या आईला दिली आहे. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास वानवडी पोलीस करत आहेत.