मोठी बातमी: शिवसेना नेते संजय राऊत यांच्या गंभीर आरोपानंतर राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय

0

मुंबई,दि.५: शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या गंभीर आरोपानंतर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) अधिकारी व व्यावसायिक जितेंद्र नवलानी यांच्यावर खंडणीचे आरोप केले होते. या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना करण्यात आल्याची माहिती, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. मुंबईमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना दिलीप वळसे पाटील यांनी ही माहिती दिली. तसेच राज ठाकरेंनी केलेल्या भाषणाच्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस योग्य ठिकाणी योग्य कारवाई करतील असे संकेत देणारं वक्तव्य गृहमंत्र्यांनी केलंय.

“आम्ही एसआयटीची स्थापना केली असून अतिरिक्त पोलीस आयुक्त वीरेश प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली ईडीच्या अधिकाऱ्यांविरोधात तपास करण्यासाठी स्थापन करण्यात आलेली एसआयटी काम करेल. त्यांना तपासासाठी जेवढा वेळ लागेल तेवढा देण्यात येईल,” अशी माहिती गृहमंत्र्यांनी दिली. गृहमंत्री आज जनता दरबारसाठी राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात आले असता विविध प्रश्नांवर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

ईडीला हाताशी घेऊन खंडणीचे रॅकेट चालवले जात असल्याचा आरोप राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला होता. राऊत यांनी या प्रकरणी नवलानी व ईडी अधिकाऱ्यांनी काही कंपन्यांकडून रक्कम घेतल्याचा आरोप केला. त्यानंतर पोलिसांनी कंपन्यांना नोटीस बजावून प्रकरणात अधिक माहिती देण्याची मागणी केली आहे. याप्रकरणी तक्रारदार अरिवद भोसले यांनी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्याकडे तक्रार केली होती. या प्रकरणात करण्यात आलेल्या तक्रारीप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेला चौकशी करण्यास सांगण्यात आले होते.

उपायुक्त दर्जाचा अधिकारी ही चौकशी करत होते. पण याप्रकरणी आर्थिक गुन्हा नसून हे खंडणीचे प्रकरण असल्यामुळे आता या प्रकरणाची चौकशी गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाला वर्ग करण्यात आली आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे) वीरेश प्रभू या विशेष तपास पथकाचे प्रमुख आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाची चौकशी होणार आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here