जालना,दि.27: कोविड-19चा (Covid – 19) नवीन प्रकार B.1.1529 दक्षिण आफ्रिकेत समोर आला आहे. नवीन प्रकार (Omicron) समोर आल्यानंतर, शास्त्रज्ञांनी जागतिक स्तरावर कोविड संसर्गामध्ये झपाट्याने वाढ होण्याची भीती व्यक्त केली आहे. भारतात या व्हेरिएंटचा (Omicron) एकही रुग्ण अद्याप आढळलेला नाही. हा व्हेरीयंट फारच धोकादायक असेल तर आफ्रिकेतून महाराष्ट्रात होणारी विमान वाहतूक बंद करावी, अशी मागणी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे केल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी आज जालना येथे दिली.
कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार पूर्ण काळजी घेत आहे. सध्या विमानतळावर बाहेरून येणाऱ्या रुग्णांचं मॉनिटरिंग होत असून स्वाइप टेस्टिंग आणि स्क्रिनिंग सुरू आहे. विमान प्रवासासाठी 72 तास आधीच कोरोना टेस्टिंग प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आलं आहे. विमानतळावर कडक तपासणी केलं जातं असून कवारंटाईन करण्याचा नियम करण्यात आला आहे. दक्षिण आफ्रिकेतून येणारी विमानं बंद करण्यासाठी मुंबई महापालिका आयुक्तांच्या पत्रासह एक विनंती पत्र केंद्राला पाठवण्यात आलेलं आहे. केंद्रानं अभ्यास करून यावर निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा टोपे यांनी यावेळी व्यक्त केली.
शाळा सुरू करण्याबत फेरविचार
येत्या 1 डिसेंबरपासून राज्यांतील शाळा सुरू करण्याचा निर्णय झाला होता. मात्र, त्याबाबत उद्या आरोग्य विभागांच्या अधिकाऱ्यांसह इतर विभागाच्या अधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठक होणार आहे. त्यानंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल, असंही टोपे म्हणाले. राज्यात लसीकरण वेगानं सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं.