शरद पवार गटाचा शिवसेना शिंदे गटाला धक्का

0

मुंबई,दि.१८: शरद पवार गटाने शिवसेना शिंदे गटाला धक्का दिला आहे. २०२४ च्या निवडणुकीसाठी सगळे पक्ष आणि इच्छुक उमेदवार तयारीला लागले आहेत. या निवडणुकीत शिवसेना(शिंदे)-भाजपा-अजित पवार गट यांच्या महायुतीची शरद पवार गट-शिवसेना(उबाठा)-काँग्रेस महाविकास आघाडीची टक्कर होणार आहे. अलीकडेच अजित पवारांसह ९ दिग्गज नेत्यांनी शरद पवारांची साथ सोडून भाजपासोबत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यात बरेच आमदार अजित पवार गटात गेले. अशावेळी शरद पवार एकाकी पडल्याची भावना झाल्याने शिंदे गटातील माजी आमदार पांडुरंग बरोरा हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.

पांडुरंग बरोरा हे आधी राष्ट्रवादीचे आमदार होते. परंतु २०१९ मध्ये बरोरा यांनी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात मातोश्रीवर जाऊन शिवबंधन हाती बांधले होते. त्यानंतर राष्ट्रवादीने शहापूर मतदारसंघात शिवसेनेतून आलेल्या दौलत दरोडा यांना उमेदवारी दिली. दौलत दरोडा यांनी बरोरा यांचा पराभव केला होता. आता दौलत दरोडा हे अजित पवार गटात गेल्यानं पांडुरंग बरोरा यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला आहे. पांडुरंग बरोरा यांनी शिवसेना शिंदे गटाला सोडचिठ्ठी दिली आहे. उद्या शरद पवारांच्या उपस्थितीत प्रदेश कार्यालयात ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील.

कोण आहेत पांडुरंग बरोरा?

पांडुरंग बरोरा हे शहापूर विधानसभेचे प्रतिनिधित्व करत होते. २०१९ च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. पांडुरंग बरोरा यांचे वडील महादू बरोरा हे ४ वेळा शहापूर विधानसभेवर निवडून आले होते. त्यांनी या मतदारसंघात बरीच विकासकामे केली आहेत. शहापूर मतदारसंघात बरोरा यांचे वर्चस्व आहे. २०१९ मध्ये बरोरा यांनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांना सोपवत कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर अलीकडच्या काळात ते एकनाथ शिंदे गटात होते.

राष्ट्रवादी प्रवेशाबाबत पांडुरंग बरोरा म्हणाले की, शहापूर तालुक्यात शरद पवारांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्याचसोबत बरोरा कुटुंबाचे शरद पवारांशी जुने ऋणानुबंध आहे. पवारांसोबत आलेल्या कौटुंबिक नात्यांमुळे सध्याच्या परिस्थितीत शरद पवारांना साथ द्यावी असं आमच्या कुटुंबाला वाटते. त्यामुळे आम्ही पुन्हा स्वगृही परततोय असं त्यांनी सांगितले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here