ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर सीरम इन्स्टिट्युटने केली केंद्र सरकारकडे ही मागणी

0

नवी दिल्ली,दि.२: दक्षिण आफ्रिकेत (South Africa) कोरोनाचा ओमिक्रॉन व्हेरिएंट (Omicron Variant) आढळल्यानंतर अनेक देशात कठोर पावले उचलली जात आहेत. अजूनतरी ओमिक्रॉन घातक सिद्ध झाला नसला तरी त्याचा संसर्ग जास्त प्रमाणात होत असल्याने भारतातही सरकारने निर्बंध लावले आहेत. एकीकडे सरकारी पातळीवर कोविड नियमांबाबत कठोर निर्णय घेतले जात असतानाच सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाने अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. कोविडवरील कोव्हिशील्ड लसचा बूस्टर डोस देण्यास सीरमने केंद्र सरकारकडे परवानगी मागितली आहे.

भारतात सध्या कोविडवरील लसचा मुबलक साठा उपलब्ध आहे. असे असतानाच ओमिक्रॉन व्हेरिएंटचा धोका पाहता बूस्टर डोसची आवश्यकता निर्माण झाली आहे. तशी मागणीही होत आहे. या पार्श्वभूमीवर सीरम इन्स्टिट्युटने कोव्हिशील्ड लसच्या बूस्टर डोसला परवानगी देण्यात यावी, अशी मागणी भारताचे औषध महानियंत्रक यांच्याकडे केली आहे.

सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियातील एक संचालक प्रकाशकुमार सिंह यांनी याबाबत माहिती दिली. भारताचे औषध महानियंत्रक यांच्याकडे कोव्हिशील्डच्या बूस्टर डोससाठी परवानगी मागणारा अर्ज आम्ही केला आहे. ब्रिटनमध्ये अशी परवानगी आधीच देण्यात आलेली आहे, असे आम्ही यात निदर्शनास आणून दिले आहे.

बूस्टर डोस ही काळाची गरज आहे आणि प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्याच्या अधिकारांचाही प्रश्न आहे. या महामारीत स्वत:चा बचाव करण्यासाठी बूस्टर डोसची मागणी होत असेल तर तो दिला गेला गेला पाहिजे. त्यापासून कुणी वंचित राहू नये, असेही सिंह यांनी नमूद केले. कोविड महामारीचे गांभीर्य लक्षात घेत जगातील अनेक देशांनी बूस्टर डोस देण्याची मोहीम हाती घेतली आहे, याकडेही सीरमने लक्ष वेधले आहे.

दरम्यान, ओमिक्रॉनचा धोका लक्षात घेता तातडीने बूस्टर डोसला मान्यता दिली गेली पाहिजे, असा आग्रह आधीच केरळ, राजस्थान, कर्नाटक, छत्तीसगड या राज्यांनी केंद्र सरकारकडे धरला आहे. आता सीरमने याबाबत अधिकृत अर्ज करत परवानगी मागितली असून ही परवानगी मिळाल्यास भारतात लवकरच बूस्टर डोस देण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here