नागपूर,दि.12: महायुतीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप होणार आहे. महायुतीचे घटक असलेले प्रहार जनशक्ती संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी महायुतीचे टेन्शन वाढवले आहे. लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीची साथ सोडत वेगळी चुल मांडणारे बच्चू कडू यांनी विधानसभा निवडणुकीसाठीही ‘एकला चलो’ची भूमिका घेतली आहे.
प्रहार जनशक्ती पक्षाची गुरुवारी बैठक बोलाविण्यात आली असून तीत विधानसभा निवडणुकीत 20 जागा लढण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. बच्चू कडू महायुतीतून बाहरे पडणार असल्याची चर्चा रंगली आहे. कारण, विधानसभा निवडणुकीत 20 जागा स्वबळावर लढण्याचा निर्णय बच्चू कडू यांनी जाहीर केला आहे. बच्चू कडू हे महायुतीत नाराज असल्याची देखील चर्चा रंगली आहे.
बच्चू कडू यांनी विधानसभेला एकला चलो चा… नारा दिला आहे. विधानसभेसाठी 20 जागा लढवणार असल्याची घोषणा बच्चू कडू यांनी केली आहे. बच्चू कडू महायुतीतून निवडणूक लढवणार नाहीत अशी देखील चर्चा आहे. नागपूरमध्ये ते बोलत होते. बैठकीमध्ये विधानसभेबाबत निर्णय होणार असल्याचं बच्चू कडू म्हणालेत.
दोन दिवस वेळ द्या, मी सगळं
बच्चू कडू यांनी बुधवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना म्हणाले, लोकसभेत बच्चू कडू यांना सोबत का घेतले नाही हा प्रश्न मला विचारण्यापेक्षा त्यांना विचारा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याच्या निमंत्रणाची मी वाट पाहिली नाही. एनडीएकडून एक एक पाऊल पडत आहे. ते माझ्या सोईचे पडत आहे. आम्ही सोबत राहून त्यांना मदत केली. पण एका वर्षात त्याचे परिणाम आम्हाला भोगावे लागले, असे सांगत त्यांनी महायुतीबद्दल नाराजी व्यक्त केली. फुटीचे कारण काय ते दोन दिवस वेळ द्या, मी सगळं सांगेन, असेही त्यांनी स्पष्ट केले.
संघाच्या भूमिकेला समर्थन
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका फार महत्त्वाची राहिली आहे. त्यांनी नैतिकता सोडली नाही. त्याचेच फटके राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दाखविले आहे. अमरावतीमध्ये राणाला मदत करू नका तसे तर पत्र काढले आणि त्याचा परिणाम ही भोगावा लागला, असे सांगत संघाचा भूमिकेला कडू यांनी एकप्रकारे समर्थन दिले.
मनोज जरांगेंनी उपोषण मागे घ्यावं त्यांची समाजाला गरज आहे. त्याचबरोबर जरांगेंनी जास्तीत जास्त आमदार निवडून आणून कायदा पारित करून घ्यावा, असा सल्ला बच्चू कडूंनी जरांगेंना दिला.