पाकिस्तानचा झेंडा तालिबान्यांनी फाडला

0

दि.22 : तालिबानला पाकिस्तानचे समर्थन आहे हे सर्वश्रुत आहे. पाकिस्तान तालिबनला मदत करतो. अफगाणिस्तानमध्ये मदत घेऊन जाणाऱ्या पाकिस्तानी ट्रकवरचा झेंडा तालिबानी फायटर्सनी फाडून टाकला. अफगाणिस्तानमधील काबुल आणि इतर भागांना जीवनावश्यक वस्तूंचा पाकिस्तानकडून पुरवठा केला जात आहे. त्यासाठी पाकिस्तानी ट्रक अफगाणिस्तानच्या विविध भागात फिरत असल्याचं चित्र आहे. असाच एक पाकिस्तानचा झेंडा लावलेला ट्रक पाहून तालिबान्यांना संताप अनावर झाला. त्यांनी हा ट्रक रोखला आणि त्यावरील पाकिस्तानचा झेंडा उतरवून फाडून टाकला.

अफगाणिस्तानला पाकिस्तानकडून सध्या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला जात आहे. विशेष म्हणजे या ट्रकवर पाक-अफगाणिस्तान को-ऑपरेशन फोरम असं लिहिलेलं होतं. दोन्ही देशांच्या परस्पर सहमतीनं सुरू असलेल्या या उपक्रमातील पाकिस्तानी झेंडा तालिबान्यांना सहन न झाल्याने त्यांनी तो फाडून टाकला. या ट्रक ड्रायव्हरला तालिबान्यांकडून धमकावलं गेल्याचंही या व्हिडिओत स्पष्ट दिसतं. पुन्हा ट्रकवर अशा प्रकारे पाकिस्तानी झेंडा न लावण्याची धमकी तालिबान्यांनी दिली आहे.

पाकिस्तानकडून आर्थिक आणि इतर मदत पुरवली जात असली, तरी पाकिस्तानच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे तालिबान नाराज असल्याचं गेल्या काही दिवसांतील वक्तव्यंमधून दिसून येत आहे. आपल्या देशातलं सरकार कसं असावं, याबाबत पाकिस्तानसह कुठल्याही देशाने हस्तक्षेप करू नये, असं विधान तालिबान सरकारकडून करण्यात आलं होतं. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना तालिबाननं एक प्रकारे इशाराच या विधानातून दिला होता. तालिबानमध्ये सर्वसमावशेक सरकार असावं, असं विधान इम्रान खान यांनी केलं होतं. मात्र ते तालिबानला रुचलं नसल्याचं त्यावरून स्पष्ट झालं आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here