ईडी ज्याच्या घरी तो भाजपच्या दारी, पन्नास खोके, माजलेत बोके; विरोधकांची जोरदार घोषणाबाजी

0

मुंबई,दि.२२: पन्नास खोके, माजलेत बोके… पन्नास खोके, एकदम ओके… ईडी ज्याच्या घरी तो भाजपच्या दारी…आज अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विरोधकांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर उभे राहून जोरदार घोषणाबाजी केली. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केल्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडले.

एकनाथ शिंदे यांच्या बरोबर शिवसेनेचे ४० आमदार गेले आहेत. भाजपाने पाठिंबा दिल्याने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. एकनाथ शिंदे यांच्या बरोबर गेलेल्या सर्व आमदारांना भाजपाकडून प्रत्येकी ५० कोटी रूपये देण्यात आला आरोप विरोधक सातत्याने करत आहेत.

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर हे पावसाळी अधिवेशन तुफान वादळी होणार याची साऱ्यांनाच कल्पना होती. त्या अनुषंगाने अधिवेशनाचे पहिले दोन दिवस तुलनेने शांततेत गेले. पण आज मात्र महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर सरकारविरोधात जोरदार निदर्शने केली. “खाऊन खाऊन पन्नास खोके, माजलेत बोके माजलेत बोके…”, अशी घोषणाबाजी करत विरोधकांनी शिंदे गटाचा समाचार घेतला. तसेच, “पन्नास खोके, एकदम ओके… गद्दारांचं सरकार हाय हाय!!!… आले रे आले गद्दार आले…”, अशादेखील घोषणा देत टीका केली. तशातच, “ईडी ज्याच्या घरी तो भाजपच्या दारी… स्थगिती सरकार हाय हाय…”, अशा घोषणा देत भाजपालाही टोला लगावला.

या घोषणाबाजीच्या वेळी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या आमदारांनी सरकारला धारेवर धरलं. विधानभवनाच्या पायर्‍यांवर शिंदे फडणवीस सरकारच्या विरोधात साऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. आता सरकारला रोखठोक प्रश्न विचारले जातील आणि असे या आंदोलनातून आम्ही दाखवून दिले आहे, असा संदेश विरोधकांनी दिला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here