ओडिशा,दि.12: ओडिशा राज्यातील चिलिका येथील आमदार प्रशांत जगदेव (MLA Prashant Jagdev) यांच्या कारने चक्क 22 जणांना चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा अपघात ओडिशामधील खुर्दा जिल्ह्यात शनिवारी दुपारी घडला असून यामध्ये 7 पोलिसांसह 22 जण जखमी झाली आहेत. यामधील पाच जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येतेय. दरम्यान, कारने लोकांना चेंगरल्यामुळे संतप्त जमावाने आमदाराला मारहाण केली आहे. या मारहाणीत आमदार चांगलाच जखमी झाला असून त्याच्यावर तसेच जखमी माणसांवर उपचार सुरु आहेत.
जगदेव हे चेअरमन रे च्या निवडणुकीसाठी बानपूर ब्लॉककडे येते होते. कार्यालयाबाहेर मोठी गर्दी जमा झालेली होती. मात्र, आमदार महाशयांनी गर्दीतच आपली कार घुसवली. त्यामध्ये, महिला पोलीस कर्मचाऱ्यासह अनेकजण जखमी झाले. त्यामुळे, संतापलेल्या गर्दीने आमदारांच्या गाडीवर हल्ला करत त्यांना मारहाण केली. त्यानंतर, अपघातातील जखमी आणि जगदेव यांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
खोरधा पोलिसांनी घटनेची चौकशी सुरू केली असून शहरात तणाव निर्माण होऊ नये, म्हणून कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, गतवर्षी बीजू जनता दल या पक्षातून प्रशांत कुमार जगदेव यांचे निलंबन करण्यात आले आहे. तसेच, खुर्दा जिल्हा नियोजन समितीच्या अध्यक्षपदावरुनही त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.