सोलापूर,दि.७: दिवंगत आमदार भारत भालके यांचे पुत्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भगीरथ भालके हे तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भेटीसाठी हैदराबादकडे रवाना झाले आहेत. केसीआर यांनी भगीरथ भालके यांच्यासाठी पुण्याला खास विमान पाठवले आहे. भगीरथ भालके हे २०२४ मध्ये भारत राष्ट्र समितीकडून विधानसभेची निवडणूक लढविण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. राव यांच्यासोबतच्या या भेटीत काय काय ठरते, यावर बरंच काही अवलंबून आहे.
अलीकडेच खा. शरद पवार यांच्या उपस्थितीत विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.त्यानंतर राष्ट्रवादीचे भगीरथ भालके यांना भारत राष्ट्र समितीचे प्रमुख तथा तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या कार्यालयातून पक्षप्रवेशासाठी संपर्क साधण्यात आला होता. मात्र, भालके यांनी आजपर्यंत ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतली होती. मात्र, ते चार्टर्ड विमानाने आज, बुधवारी सकाळी हैदराबादला रवाना होणार असल्याचे सांगितले आहे.
अभिजित पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर त्यांना विधानसभा उमेदवारीबाबत संकेतही दिले होते. त्यामुळे राष्ट्रवादीतील भालके, कल्याणराव काळे आणि युवराज पाटील हे विठ्ठल परिवारातील नेतेमंडळी नाराज झाले होते. पवारांनी सोलापुरात बोलावून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला यश आले नसल्याचे आजच्या घडामोडीवरून स्पष्ट होत आहे. भालके यांनी विधानसभेची आगामी निवडणूक संपूर्ण ताकदीने लढणार असल्याचे जाहीर केले होते. पवारांच्या दौऱ्यानंतर अवघ्या चार दिवसांत तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या कार्यालयातून भगीरथ भालके यांना फोन आला होता. भालके यांनी पक्षात प्रवेश करावा,असा प्रयत्न होता.
विधानसभेच्या उमेदवारीसह पक्षाची आणखी काही जबाबदारी देण्याचा शब्दही राव यांच्याकडून देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. हैदराबादचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी खास चार्टर्ड विमान आपल्यासाठी पाठविले आहे. आमची बैठक बुधवारी सकाळी ११ ते १२ च्या दरम्यान नियोजित आहे. त्या बैठकीत चर्चा केल्यानंतर परत येऊन जवळचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांना विश्वासात घेऊन पुढील रणनीती निश्चित केली जाणार आहे. -भगीरथ भालके, राष्ट्रवादी नेते, पंढरपूर