मुंबई,दि.15: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण सुरू केले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी 10 फेब्रुवारीपासून उपोषण सुरू केले आहे. सरकारने जानेवारीत अध्यादेश काढल्यामुळे जरांगे पाटील यांनी आंदोलन स्थगित केले होते. मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला जात प्रमाणपत्र मिळण्यासाठीच्या आणि तत्सम इतर अटींची पूर्तता न झाल्यामुळं पुन्हा उपोषण सुरु केलं.
उपोषणामुळे जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे. उपोषणामुळे प्रकृती खालवल्याने मनोज जरांगे पाटील यांच्या नाकातून रक्तस्राव होत असल्याची माहिती समोर आली आहे. जरांगे पाटील मागण्यांवर ठाम आहेत. मराठा समाजाच्या अनेकांनी आरक्षणासाठी आत्महत्त्या केल्या आहेत.
मराठा आरक्षणाच्या मुद्यावर ठाम असणाऱ्या मनोज जरांगे यांच्या उपोषणामुळं आता सरकारने मराठा आरक्षणासाठी 20 फेब्रुवारीला विधीमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावले आहे. याच अधिवेशनात मराठा आरक्षणाचा कायदा पारित होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मराठा उपसमिती बैठकीत विशेष अधिवशेनाबाबतचा निर्णय झाला होता. ज्यानंतर आता आरक्षणाचा कायदा नेमका कधी पारित होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा गुरुवारी (15 फेब्रुवारी) सहावा दिवस आहे. बुधवारी जरांगे यांना नारायण गडाचे महंत शिवाजी महाराज यांच्या मध्यस्थीनं बळजबरीनं सलाईन लावण्यात आलं होतं. पण, त्यांनी काही वेळातच उपचार घेणं बंद केलं. जोपर्यंत आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत उपचार घेणार नाही असा ईशारा जरांगेंनी दिला. बुधवारी अखेर जरांगेंच्या सहकाऱ्यांनी पत्रकारांकडे त्यांना पाणी पाजण्याचा हट्ट धरल्यानंतर पत्रकारांनी जरांगे यांना पाणी पिण्याची विनंती केली आणि त्यांच्या विनंतीला मान देत जरांगे यांनी पाणी घेतलं.