मुंबई,दि.१२: एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्याच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. संघर्ष एसटी युनियन आणि कनिष्ठ वेतन श्रेणी या संघटनांनी संपाचं नेतृत्व स्वीकारलं. मागील जवळपास १५ दिवसांपासून सुरू असलेल्या एसटी संपामुळं एकामोमाग एक एसटी बस डेपो बंद पडत गेले. कामगारांचं आंदोलन उग्र होत गेल्यामुळं बहुतेक बस आगारातच उभ्या होत्या. हा संप आजही सुरू असला तरी राज्य परिवहनच्या मुंबई सेंट्रल आगारातून पहिली मुंबई-सातारा बस मार्गस्थ झाली आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी २७ ऑक्टोबर रोजी एसटी कामगारांचं आंदोलन सुरू झालं. २८ ऑक्टोबर रोजी वाढीव महागाई भता मान्य करत काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी या पक्षांच्या कामगार संघटनांच्या संयुक्त कृती समितीनं उपोषण मागं घेतलं. मात्र, २९ ऑक्टोबरपासून कामगारांनी उत्स्फूर्तपणे संप पुकारला. संघर्ष एसटी युनियन आणि कनिष्ठ वेतन श्रेणी या संघटनांनी संपाचं नेतृत्व स्वीकारलं. त्यानंतर हा संप दिवसेंदिवस चिघळत आहे. सध्या राज्यातील २५० आगारांतील सेवा ठप्प आहे.
उच्च न्यायालयाचा मनाई आदेशही कामगारांनी धुडकावला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व राज्य परिवहन मंडळानं परोपरीनं विनवणी करूनही कामगार माघार घ्यायला तयार नाहीत. त्यामुळं मोठाच पेच उभा राहिला आहे. राज्य सरकारनं खासगी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून प्रवाशांना सेवा देता येईल का, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. काही ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्यानं कामावर येण्याची इच्छा असलेल्या कामगारांना संरक्षण पुरवण्याच्या सूचना परिवहन मंत्री अनिल परब यांनी पोलीस महासंलकांकडं दिल्या होत्या.
परिवहन मंत्री अनिल परब यांच्या सूचनेनंतर, राज्यातील सर्वच आगारामध्ये मागणीनुसार पोलीस संरक्षण पुरवण्यात येत आहे. हे संरक्षण मिळाल्यानंतर आज मुंबई सेंट्रल आगारातून पोलीस बंदोबस्तामध्ये दुपारी अडीच वाजेच्या सुमारास एम एच २० बी एल ३९५४ ही गाडी साताऱ्याच्या दिशेनं रवाना झाली. प्रवासी नसल्यानं ही गाडी रिकामीच आहे. वाटेत ज्या ठिकाणी प्रवासी उपलब्ध होतील, त्या ठिकाणाहून प्रवासी गाडीत घेणार असल्याचं एसटी महामंडळानं स्पष्ट केलं आहे.