सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर शिवसेनेकडून पहिली प्रतिक्रिया

0

मुंबई,दि.11: सुप्रीम कोर्टाच्या आदेशावर शिवसेनेचे नेते अरविंद सावंत यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रीम कोर्टाकडून हे अपेक्षित नाही सांगत त्यांनी नाराजी जाहीर केली आहे. आमदारांच्या अपात्रतेबाबत दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना सरन्यायाधीश एनव्ही रमणा म्हणाले की, आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्ष सध्या निर्णय घेणार नाहीत. न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत स्पीकरच्या अपात्रतेवरील कारवाईला स्थगिती दिली जाईल. सध्या सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्राच्या प्रकरणावर तातडीने सुनावणी करणार नाही. यासाठी खंडपीठ स्थापन करावे लागेल, असे न्यायाधीश म्हणाले.

खासदार अरविंद सावंत म्हणाले की, “डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान दिलं आहे त्याच्या मुळावर घाव घालण्याचं जे काम सुरु आहे त्याची जास्त चिंता वाटत आहे. उद्धव ठाकरेंनीही तीच चिंता व्यक्त केली आहे”.

“कायद्याची पायमल्ली होत असताना सुप्रीम कोर्ट आणि सगळेच शांत आहेत. अध्यक्षांनी निर्णय घेऊ नये सांगत सुप्रीम कोर्टाने नक्की कोणाला दिलासा दिला आहे?,” अशी विचारणा अरविंद सावंत यांनी केली आहे.

“अध्यक्षांनी आमच्या बाजूने निर्णय दिला असता का हा वेगळा प्रश्न आहे. पण सरकार तसंच राहणार का? बेकायदेशीरपणे निर्माण झालेल्या सरकारला ज्या प्रकारे संरक्षण दिलं जात आहे आणि वेळकाढूपणा केला जात आहे, न्याय देण्यास उशीर करणं हे सुप्रीम कोर्टाकडून अपेक्षित नाही. आम्ही सुप्रीम कोर्टाकडे एकमेव आशा म्हणून पाहत आहोत. शिवसेना म्हणून पाहू नका पण देशाच्या संविधानाच्या पायावर घाव घातला जात आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये असंच घडलं होतं,” असं अरविंद सावंत यांनी सांगितलं.

“मुख्यमंत्र्यांनी आमच्या संपर्कात असलेल्यांची नावं पाठवून देतो असं सांगितलं होतं. त्यांनी त्या 14 जणांची नावं द्यावीत,” असं आव्हान अरविंद सावंत यांनी यावेळी दिलं. पक्षप्रमुखांनी आम्हाला कधीच मत मांडण्यापासून रोखलेलं नाही असंही सांगत अरविंद सावंत यांनी आरोप फेटाळले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here