शेतकऱ्याने उद्धव ठाकरे यांना आसूड भेट देत केली ही मागणी

0

औरंगाबाद,दि.23: शेतकऱ्याने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना आसूड भेट देत सरकारला वठणीवर आणण्याची मागणी केली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख शेतकऱ्यांच्या भेटीला बांधावर पोहोचले आहेत. ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले आहे. शेतकऱ्यांनी आसूड उद्धव ठाकरेंना भेट दिला आणि या सरकारला वठणीवर आणा, अशी मागणीच केली.

उद्धव ठाकरे नुकसानग्रस्त भागाची पाहणीसाठी औरंगाबादेत पोहोचले आहे. दहेगाव आणि गंगापूर परिसरातील गावांची त्यांनी पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा उद्धव ठाकरेंकडे मांडली. यावेळी एका शेतकऱ्याने आसूडच उद्धव ठाकरेंना भेट दिला आणि या सरकारला वठणीवर आणण्याची मागणी केली.

‘हा आसूड तुमच्याच हातात शोभतो. तुम्ही तो वापरत नाही. तो वापरा. मी तुमच्या पाठीशी आहे. या अडचणीच्या काळात एकत्र होता. संकट दूर झाल्यावर शेतकरी दूर होतात. त्यामुळे तुम्ही सगळे शेतकरी एकत्र राहा. हा आसूड घेऊन फिरू नका, तो आता वापरायचा’ असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना धीर दिला. यावेळी मोठ्या संख्येनं शिवसैनिक उपस्थितीत होते.

दरम्यान, औरंगाबाद विमानतळावर उद्धव ठाकरे यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. महिला शिवसेना कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांचं औक्षण केलं. यावेळी कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला, अशा घोषणांनी परिसरात दणाणून सोडला होता.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here