औरंगाबाद,दि.१९: MIM चे अकबरुद्दीन ओवेसी व इतर नेत्यांनी औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतल्या नंतर महाराष्ट्रात मोठा वाद निर्माण झाला होता. शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही MIM वर जोरदार टीका केली होती. औरंगजेब कबर हवीच कशाला, असा सवाल करत मनसेने दिलेल्या इशाऱ्यानंतर पुढील पाच दिवस कबरीवर कोणासही जाता येणार नाही, असा आदेश भारतीय पुरातत्त्व विभागाच्या अधीक्षक मीनलकुमार चावले यांनी बजावला आहे. खुलताबाद येथील कबरीवर एमआयएमचे नेते नतमस्तक झाल्यानंतर घडामोडींना वेग आला होता. ही कबर औरंगाबाद जिल्ह्यात हवीच कशाला, असा सवाल पूर्वी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केला होता, असे सांगत आता मनसेने या वादात उडी घेतल्यानंतर पुढील पाच दिवस कबरीवर कोणालाही जाता येणार नसल्याचे आदेश बजावण्यात आले आहेत.
औरंगाबाद येथील कबरीच्या वादाविषयी बोलताना मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर म्हणाले, ‘ही कबर येथेच हवीच कशाला, असा प्रश्न हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी विचारला होता. आता पुन्हा तोच प्रश्न मनसेकडून विचारला गेला. खरे या कबरीकडे कोणी फिरकतच नाही. मुस्लीम लोकही कोणी जात नाही. नाहक चर्चा करण्यात अर्थ नाही, अशी भूमिका शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केली.
खुलताबाद येथील औरंगजेबाची कबर खोदल्याची अफवा पसरविण्यात आल्याने पोलीस बंदोबस्तही वाढविण्यात आला आहे. हा विशेष बंदोबस्त नाही, पण काळजी घेतली जात असल्याचे पोलीस निरीक्षक हातमोडे यांनी सांगितले.