नवी दिल्ली,दि.27: दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांना मद्य घोटाळाप्रकरणी न्यायालयाने पाच दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. आता रद्द करण्यात आलेले अबकारी धोरण 2021-22 च्या निर्मिती आणि अंमलबजावणीमध्ये कथित भ्रष्टाचार केल्याप्रकरणी न्यायालयाने रविवारी सिसोदिया यांना अटक केली होती. सिसोदिया यांना आज राऊस ॲव्हेन्यू कोर्टात हजर करण्यात आले. राऊस ॲव्हेन्यू कोर्ट कॉम्प्लेक्सच्या आत आणि बाहेर कडक सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले होते.
सीबीआयने केली पाच दिवसांच्या कोठडीची मागणी | Manish Sisodia
रविवारी केलेल्या अटकेच्या कारवाईनंतर आज सिसोदिया यांना न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी सीबीआयने पाच दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. सिसोदिया यांच्या सांगण्यावरून कमिशन 5 कोटींवरून 12 कोटी रुपये करण्यात आले. चौकशीसाठी रिमांड आवश्यक असल्याचा मुद्दा सीबीआयने कोर्टात मांडला.
नायब राज्यपालांच्या मंजुरीनंतर कमिशनमध्ये वाढ करण्यात आली
सीबीआयने मागितलेल्या मनीष सिसोदिया यांच्या कोठडीला त्यांचे वकील दयान कृष्णा यांनी विरोध केला. रिमांड मागण्याचे कोणतेही कारण नसून तपासात असहकार्याचे आरोप निराधार असल्याचेही त्यांनी कोर्टात नमूद केले. सिसोदिया यांच्या वकिलाने सांगितले की, नायब राज्यपालांच्या मंजुरीनंतर कमिशनमध्ये वाढ करण्यात आली आहे. नायब राज्यपालांना याबाबतची सगळी माहिती होती, असेही त्यांनी म्हटले. मद्य धोरणाच्या निर्णय प्रक्रियेत पारदर्शकता होती, असेही त्यांनी म्हटले.
मनीष सिसोदिया यांचे वकील दयान कृष्णा म्हणाले की, सिसोदिया यांना बजावण्यात आलेल्या प्रत्येक नोटिशीनंतर ते सीबीआयसमोर हजर झाले. कोर्टात सिसोदिया यांच्यावतीने तीन वकील उपस्थित होते. सुनावणी पूर्ण झाल्यानंतर राऊस ॲव्हेन्यू कोर्टाने मनीष सिसोदिया यांच्या सीबीआयच्या कोठडीच्या मागणीवरील निर्णय काही काळासाठी राखून ठेवला होता.
तत्पूर्वी, सीबीआयने दिल्ली उत्पादन शुल्क धोरण प्रकरणासंदर्भात आठ तासांच्या चौकशीनंतर रविवारी उपमुख्यमंत्र्यांना अटक केली होती. सोमवारी दुपारी त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली, त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले.
अरविंद केजरीवाल यांचा सीबीआयबाबत दावा
आम आदमी पार्टीचे निमंत्रक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांनी मनीष सिसोदिया यांच्या अटकेचा निषेध केला आहे. केजरीवाल यांनी ट्विट करत म्हटले की, बहुतेक सीबीआय अधिकारी मनीष सिसोदियांच्या अटकेच्या कारवाई विरोधात होते, असे मला काहींनी सांगितले आहे. प्रत्येकाला त्यांच्याबद्दल खूप आदर आहे आणि त्यांच्या विरोधात कोणतेही पुरावे नाहीत, परंतु त्यांना अटक करण्यासाठी राजकीय दबाव इतका मोठा होता की त्यांना हे करावे लागले असल्याचा दावा सिसोदिया यांनी केला.
मनीष सिसोदियांनंतर KCR यांच्या मुलीचा नंबर
अबकारी घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक झाल्यानंतर तेलंगणा भाजपाचे नेते विवेक व्यंकटस्वामी यांनी खळबळजनक दावा केला आहे. सिसोदिया यांच्यानंतर आता तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांची कन्या के.कविता यांना लवकरच अटक केली जाईल, असं विधान विवेक व्यंकटस्वामी यांनी केलं आहे.
“मद्य अबकारी कराच्या घोटाळ्यासंदर्भात आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे. के.कविता यांनाही लवकरच अटक केली जाईळ. पंजाब आणि गुजरात निवडणुकीवेळी के.कविता यांनी आम आदमी पक्षाला 150 कोटी रुपयांची मदत केली होती”, असा आरोप भाजपा नेते विवेक व्यंकटस्वामी यांनी केला आहे.