पुणे,दि.२: पुण्यात (Pune) शुक्रवारी चक्क कुरीअर सेवेने धारदार तलवारी (Sword) पोहोचल्या आणि एकच खळबळ उडाली. पुण्यातील डीटीडीसी कंपनीच्या कुरीअर सेवेद्वारे तीन तलवारी पार्सलमधून आल्या आहेत. लुधियानाहून या तलवारी कुणीतरी पार्सल केल्याची प्राथमिक माहिती स्वारगेट पोलिसांनी दिली आहे. लुधियानाहून या घातक शस्त्रांचे पार्सल पुण्यातील डीटीडीसी पार्सल ऑफिसमध्ये आल्यानंतर तिथल्या कर्मचाऱ्यांना शंका आली. पार्सल हे पूर्णपणे पॅक केले असल्याने पॅकिंगच्या आत नेमकी काय वस्तू आहे हे कळत नव्हते.
मात्र कुरीअर कर्मचाऱ्यांना पार्सलबाबत शंका आली म्हणून त्यांनी पोलीस कंट्रोल रूमला फोन केला. त्यानंतर स्वारगेट पोलीस डीटीडीसीच्या ऑफिसला पोहोचले. पार्सल उघडल्यानंतर पार्सलमध्ये धारदार तलवारी असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी या तलवारी जप्त केल्या आहेत. या तलवारी ज्याच्या नावे आल्या त्याचा शोध पोलीस घेत असल्याची माहिती स्वारगेट पोलिसांनी दिली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यात हिंसेचे प्रकार वाढत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे यावेळी या तलवारी मागवण्याचा उद्देश काय होता ? हे शोधणे आता पुणे पोलिसांसमोरील आव्हान असणार आहे. पुण्यातले टोळी युद्ध हे महाराष्ट्रात सर्वांनाच परिचित आहे. त्यामुळे एखाद्या टोळीने या तलवारी मागवल्या होत्या का? याचाही शोध आता पुणे पोलीस घेत आहेत. बुधवारी ३० मार्च रोजी औरंगाबादमध्ये एकाचवेळी कुरियरने तब्बल ३७ तलवारी शहरात मागवण्यात आल्याचे स्पष्ट झाल्याने खळबळ उडाली होती.
पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईनंतर हे समोर आले होते.
त्यामुळे एवढ्या मोठ्याप्रमाणात तलवारी शहरात कशासाठी मागवल्या गेल्या याचा शोध पोलीस घेत आहेत. असे असताना आता पुण्यातही तलवारी आल्याने याचे गांभिर्य अधिकच वाढले आहे.