नवी दिल्ली,दि.6: भाजपाच्या नेत्याने महिलेला शिवीगाळ अन् धक्काबुक्की केल्याची घटना घडली आहे. स्वतःला मोठा नेता समजत गुंडगिरी करणाऱ्याचे श्रीकांत त्यागी असे नाव आहे.श्रीकांत त्यागीने एका महिलेला शिवीगाळ आणि धक्काबुक्की केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या श्रीकांत त्यागीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून त्यामध्ये तो महिलेला अपशब्द बोलताना दिसत आहे. तसेच धक्काही मारतो. तिथे उपस्थित असलेल्या काही लोकांनी आपल्या फोनमध्ये हा भयंकर प्रकार रेकॉर्ड केला आहे. नोएडाच्या सेक्टर 93 बी येथील ग्रँड ओमेक्स सोसायटीमध्ये ही घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, श्रीकांत त्यागी भाजपाच्या किसान मोर्चाचा नेता आहे. सोसायटीमधील पार्कवर अवैधरित्या कब्जा केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. ज्यामुळे सोसायटीच्या लोकांनी अनेकदा तक्रार केली आहे. तसेच श्रीकांतला 15 दिवसाची एक नोटीस देखील देण्यात आली आहे. पण तरीही स्वत:ला मोठा नेता समजून त्याने सोसायटीमधील लोकांवर दादागिरी केली आहे. महिलेला शिवीगाळ आणि धक्काबुक्की केल्याप्रकरणी भाजप नेते श्रीकांत त्यागीवर कलम 354 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पार्कवर केलेल्या अवैध कब्जासंदर्भात सोसायटीतील एका महिलेने श्रीकांत त्यागीला जाब विचारला. तेव्हा त्याने महिलेला शिवीगाळ केला. तसेच महिलेने जेव्हा त्याला कडाडून विरोध केला. तेव्हा त्याने तिला जोराचा धक्का दिला आणि मारण्याचा देखील प्रयत्न केला. या घटनेने एकच खळबळ उडाली. सोशल मीडियावर हा व्हि़डीओ जोरदार व्हायरल झाल्यावर नोएडा पोलिसांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.
पोलिस आयुक्त आलोक सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेसोबत गैरवर्तनाचा व्हिडिओ समोर आला आहे. याप्रकरणी तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. श्रीकांत त्यागीला अटक करण्यासाठी पोलिसांचे पथक तयार करण्यात आले आहे.
आजूबाजूचे लोक तिथे मूक प्रेक्षक बनून उभे असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. श्रीकांत त्यागी याला त्याच्या पत्नीने लखनौमधील फ्लॅटमध्ये दुसऱ्या महिलेसोबत अश्लील चाळे करताना पकडले होते. श्रीकांत त्यागी यांची सुरक्षा सुमारे दोन वर्षांपूर्वी काढण्यात आली होती.