‘या’ महिन्यात महाराष्ट्रात येणार भाजपचे सरकार, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा दावा

0

सोलापूर,दि.26: महाराष्ट्रातील (Maharashtra) महाविकास आघाडीचं सरकार (Mahavikas Aghadi Government) कोसळणार असल्याचा दावा केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी केला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय भूकंप येण्याची शक्यता आहे. येत्या मार्चपर्यंत महाराष्ट्रात भाजपचे सरकार स्थापन होईल. आता सर्व काही ठीक होईल, असे नारायण राणे यांनी जयपूरमध्ये म्हटले आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे हे शुक्रवारी (दि.26) जयपूर दौऱ्यावर होते.

महाविकास आघाडी सरकार कोसळल्यावर मार्च महिन्यात महाराष्ट्रात भाजपचं सरकार येणार अशी राजकीय भविष्यवाणी नारायण राणेंनी केली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे हे शुक्रवारी जयपूर दौऱ्यावर होते त्यावेळी त्यांनी हे विधान केले आहे.

यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप झाला आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आपले सर्व कार्यक्रम रद्द करून आज दुपारी दिल्लीत पोहोचत आहेत. शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल हे सोबतच मुंबईहून दिल्लीला रवाना झाले आहेत. दुसरीकडे, भाजपचे नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही आज सकाळीच दिल्लीत पोहोचले आहेत.

नारायण राणे म्हणाले, महाराष्ट्रात भाजपचं सरकार नाहीये त्यामुळे तिथे तसं होत आहे. लवकरच महाराष्ट्रात भाजपचं सरकार येईल. मार्च महिन्यात भाजपचं सरकार येईल आणि तुम्हाला अपेक्षित असा बदल दिसून येईल.

नारायण राणे पुढे म्हणाले, काही गोष्टी गुप्त ठेवाव्या लागतील. जाहीरपणे गोष्टी गेल्या तर एखादा महिना सरकार आणखी राहिल आणि मग भाजपचं सरकार येण्याची तारिखही पुढे जाईल.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या राजकीय भविष्यवाणीवर शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं, राणे काय म्हणतात यावर सरकार चालत नाही, संख्या बळावर चालतं आघाडीकडे पूर्ण संख्याबळ आहे आणि हे सरकार 5 वर्षे पूर्ण करेल.

महाराष्ट्र भाजपचे अनेक नेतेही कालपासूनच दिल्लीत दाखल झाले आहेत. महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची कालच भेट घेतली. त्या बैठकीला देवेंद्र फडणवीसही उपस्थित राहणार होते. मात्र, ते उशिरा दिल्लीत पोहोचले. सध्या भाजप मुख्यालयात चंद्रकांतदादा पाटील आणि देवेंद्र फडणवीस संघटनमंत्री बी. एल. संतोष यांची भेट घेत आहेत.

या वृत्ताशी संबंधित सूत्रांकडून आणखी एक मोठी माहिती समोर येत आहे. शिवसेनेचे राज्यसभा खासदार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निकटवर्तीय नेत्याची महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भेट घेतली, असं बोललं जातंय.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here