मुंबई,दि.18: मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला आहे. जलद प्रवासासाठी ओळखल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गावरही दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये तीन जणांना आपले प्राण गमवावे लागले. वाशिम जिल्ह्यातून जाणाऱ्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर जऊळका पोलीस ठाण्याच्या हद्दीत डव्हा गावाजवळ रात्री उशिरा एक भीषण अपघात झाला. इनोव्हा कारवरील नियंत्रण चालकाच्या हातातून सुटल्याने कार थेट डिव्हायडरवर जाऊन धडकली. धडकेचा जोर एवढा प्रचंड होता की कारचा पुढील भाग पूर्णतः चक्काचूर झाला.
या भीषण अपघातात म्यानमार येथील दोघांचा घटनास्थळी तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून इतर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.एक जण किरकोळ जखमी आहे.प्राथमिक माहितीनुसार, ही इनोव्हा कार मुंबईहून नागपूरच्या दिशेने जात होती. मात्र, अचानक चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा दुर्दैवी अपघात घडला.अपघाताची माहिती मिळताच पोलीस ठाण्याचे कर्मचारी तत्काळ घटनास्थळी पोहोचले.त्यांनी जखमींना वाशीम येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून, मृतदेहांना शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. पोलिसांकडून अपघाताचा पुढील तपास सुरू आहे.
याशिवाय, समृद्धी महामार्गावर शहापूरजवळ झालेल्या अन्य एका अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले. समृद्धी महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढत आहे. जलद प्रवासासाठी म्हणून हा महामार्ग तयार करण्यात आला आहे. मात्र आतापर्यंत समृद्धी महामार्गावर अनेक अपघात झाले आहेत. अपघातात अनेकांना जीव गमवावा लागला आहे.








