अक्कलकोट,दि.३: लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान (मूळस्थान) अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकटदिन सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या भक्तीभावाने व अपार श्रद्धेने पार पडला. रविवार दिनांक ३/४/२०२२ रोजी स्वामी प्रकटदीन रोजी पहाटे ५ वाजता श्रींची काकड आरती मंदिराचे पुजारी मोहन महाराज यांच्या हस्ते व समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या उपस्तिथीत करण्यात आली. त्यानंतर स्वामी भक्तांच्या गर्दीमुळे स्वामींचे दर्शन भाविकांना सुलभतेने होणेकरिता सर्व स्वामी भक्तांना टप्प्या टप्प्याने दर्शनास सोडण्यात आले.
सकाळी १० ते १२ या वेळेत ज्योतिबा मंडपात देवस्थानचे विश्वस्ता उज्वलाताई सरदेशमुख व सहकाऱ्यांचे सत्संग महिला भजनी मंडळ अक्कलकोट यांच्या वतीने भजन होऊन गुलाल पुष्प वाहण्यात आले, त्यानंतर पाळणा कार्यक्रम संपन्न झाला. यानंतर मंदिर समिती चेअरमन महेश इंगळे यांच्या हस्ते व मोहन महाराज पुजारी, मंदार महाराज पुजारी यांच्या वतीने आरती करण्यात आली. अशा प्रकारे भजनगीत, पाळणा व आरती होऊन स्वामींचा जन्मोत्सव साजरा झाला.
स्वामी प्रकट दिनानिमित्त आज वटवृक्ष मंदिरात देवस्थानच्या वतीने नैवेद्य आरतीनंतर सर्व स्वामी भक्तांना शिरा प्रसाद वाटप करण्यात आले. मंदीरात भाविकांच्या वतीने होणाऱ्या संकल्पित अन्नदानच्या माध्यमातून दुपारी १२ ते ३ या वेळेत देवस्थानच्या मैंदर्गी-गाणगापूर रोडवरील देवस्थानच्या भक्त निवास भोजनकक्ष येथे उपस्थित सर्व स्वामी भक्तांना स्वामी प्रसाद म्हणून देण्यात आलेले भोजन प्रसाद ग्रहण करून हजारो स्वामी भक्त तृप्त झाले.

भाविकांनी स्वामी दर्शन व भोजन महाप्रसादाची तृप्ती अनुभवल्यानंतर दुपारी १२ ते १ व सायंकाळी ४ ते ६ या वेळेत सोलापूरचे प्रसिद्ध सुंद्री वादक भीमण्णा जाधव यांचा सुंद्री वादनाच्या व सोलापूरच्या व्यंकटेश संगीत विद्यालयाच्या विद्यार्थिनी रसिका / सानिका कुलकर्णी यांचा शास्त्रीय राग गायनाचा सुमधुर भावभक्तिगीतांच्या गायन सेवेने उपस्थित भाविकांचा स्वामी प्रकट दिनाचा आनंद द्विगुणित झाला. स्वामी प्रकट दिनानिमित्त देवस्थाने रक्तदान शिबीरांच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकीही जोपासली आहे. देवस्थानच्या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून १२८ रक्तदात्यांनी रक्तदान करून रुग्णसेवेतून समाज सेवेत सहभाग नोंदविला. गुढी पाडवा, शनिवार, रविवारच्या सलग सुट्टयांमुळे दिवसभरात हजारो स्वामी भक्तांनी स्वामींचे दर्शन घेतले.
आज स्वामी प्रकट दिनानिमीत्त तालुक्याचे माजी आमदार सिध्दाराम म्हेत्रे, अक्कलकोट संस्थानचे मालोजीराजे भोसले व कुटूंबीय, सोलापूर ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव व कुटुंबीय, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव, तहसीलदार बाळासाहेब शिरसाट, उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रसिंह गौर, पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी, प्रशिक्षित सहाय्यक पोलीस अधीक्षक आश्विन कार्तिक (आयपीएस), औरंगाबादचे उद्योजक राजसिंह दर्डा, पनवेलचे उद्योजक कपिल पाटील, अहमदनगरचे वैद्य जीवन कटारिया, पुण्याचे उद्योगपती प्रथमेश देशमुख आदी मान्यवरांसह हजारो स्वामी भक्तांनी श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले.

कोरोनाच्या विघ्नामुळे आज दोन वर्षानंतर स्वामी समर्थांचे मूळस्थान असलेल्या वटवृक्ष मंदिरात उपस्थित राहून स्वामी प्रकट दिन सोहळ्याचा साक्षीदार या जन्मी पुन्हा होता आल्याने अनेक निस्सीम स्वामी भक्तांच्या नयनात आनंदाश्रू तरळले. भाविकांना सुरक्षितपणे दर्शन घेण्याकामी व प्रसंगानुरुप योग्य ते मार्गदर्शन करण्याकामी मंदिर समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, संपतराव शिंदे, दयानंद हिरेमठ, उज्वलाताई सरदेशमुख, श्रीशैल गवंडी, श्रीनिवास इंगळे, स्वामलिंग कांबळे, बंडेराव घाटगे, बाळासाहेब घाटगे, अक्षय सरदेशमुख, श्रीपाद सरदेशमुख, शिवशरण अचलेर, प्रसाद सोनार, ज्ञानेश्वर भोसले, संतोष जमगे, स्वामीनाथ लोणारी, संजय पवार, अमर पाटील, महादेव तेली, संजय पाठक, सागर गोंडाळ, गिरीश पवार, दीपक जरीपटके, रवि मलवे, मंगेश फुटाणे, शंकर पवार, अरविंद कोकाटे, बसवराज आलमद, सातलिंगप्पा आलमद, लखन गवळी, श्रीकांत मलवे आदींसह मंदिर समितीचे अन्य कर्मचारी सेवेकऱ्यांनी परिश्रम घेतले. आज स्वामी प्रकटदिना निमित्त पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली अक्कलकोटचे उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रसिंह गौर व पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांनी मंदिर समिती व परिसरास चोख बंदोबस्त पुरवून विशेष सहकार्य केले.