सोलापूर,दि.17: ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी X वर व्हिडीओ शेअर केला आहे. अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा व्हिडीओ शेअर केला आहे. सुषमा अंधारे यांनी शेअर केलेल्या व्हिडीओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सुषमा अंधारे यांनी शेअर केलेल्या व्हिडीओत दिसत आहे की, ड्रायव्हरच्या बाजूला सीटवर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बसत आहेत. तर पाठिमागे एका खिडकीच्या बाजूला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बसले आहेत. त्यांच्याबाजूला सीटच्या मध्यभागी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे बसले आहेत, त्यानंतर त्यांच्या बाजूला उपमुख्यमंत्री अजित पवार बसले आहेत.
याच गाडीत मंत्री गिरीश महाजन हे देखील मागच्या सीटमध्ये अजित पवारांच्या बाजूला बसत असल्याचे दिसत आहे. कारच्या मधल्या सीटवर तीनजण बसण्याची जागा असते, मात्र व्हायरल व्हिडीओत चारजण बसलेले दिसत आहेत.
व्हिडीओ शेअर करत अंधारे यांनी, ‘जर केली नसती सुरत गुवाहाटी तर कशाला झाली असती दाटीवाटी’ असे कॅप्शन दिले आहे. यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादी (अजित पवार गट) प्रदेश उपाध्यक्ष सलीम सारंग यांनी, ‘जेव्हा जनता असते नेत्यांच्या पाठी, तेव्हा नेत्यांनाही चालते केलेली दाटीवाटी.. जर तुम्ही केली नसती दमदाटी, तर तुमच्याकडेही कार्यकर्त्यांची झाली असती दाटीवाटी.’ असे ट्वीट करत उत्तर दिले आहे.