Supriya Sule: सुप्रिया सुळें यांचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत मोठं विधान

0

इंदापूर,दि.२९: खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबाबत मोठं विधान केलं आहे. खासदार सुप्रिया सुळे आपल्या पक्षाबाबत नेहमीच आत्मविश्वास दाखवतात. तसेच, शरद पवार यांच्या राजकीय चातुर्याचंही त्यांच्याकडून सातत्याने कौतुक होत असतं.महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा मोठा वाटा होता. त्यामुळे राज्यातून गेलेली सत्ता पुन्हा आणण्यासाठी शरद पवार आता कोणती रणनीती अवलंबणार याची चर्चा आहे. यादरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी एक मोठं विधान केलं आहे. त्या इंदापूरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलत होत्या.

साताऱ्यातील शरद पवारांच्या सभेनंतर राज्यात बदललेलं राजकारण हा चर्चेचा देशपातळीवरील लक्षवेधी विषय ठरला होता. शरद पवार यांच्या खेळीनेच महाविकास आघाडीचा जन्म झाला होता. मात्र, फडणवीसांच्या खेळीने शिवसेनेत उभी फूट होऊन एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत. त्यामुळे, सत्तेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विरोधात बसला आहे. आता, सुप्रिया सुळेंनी पुन्हा एकदा सत्तेत येण्याचं विधान केलं आहे.

“निवडणुकीत काय होतं हे आमच्यापेक्षा जवळून कोणी पाहिलेलं नाही. शरद पवारांचं ५५ वर्षांचं राजकारण आणि समाजकारण पाहिलं तर त्यात जितके चढ आहेत तितकेच उतार आहेत. ५५ वर्षांतील २७ वर्ष ते सत्तेत आणि २७ वर्ष विरोधात होते. पण मी नेहमी त्यांना महाराष्ट्राने तुम्हाला प्रचंड प्रेम दिलं आहे सांगते. पण विरोधात असताना महाराष्ट्राने सर्वात जास्त प्रेम दिलं,” अशा भावना सुप्रिया सुळेंनी व्यक्त केल्या.

“शरद पवार विरोधात गेले की दौऱ्यावर निघतात. पण त्या दौऱ्यामध्ये काय गंमत होते माहिती नाही. काही दिवस एक महाराष्ट्राचा दौरा झाला की ते पुन्हा सत्तेत येऊन बसतात,” असं सूचक विधान सुप्रिया सुळेंनी केली.

“महाविकास आघाडीचं सरकार येईल असं कोणाला स्वप्नातही वाटलं नव्हतं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपला असं सगळे म्हणत होते. रोज सकाळी उठलो की आज पक्ष सोडून कोण गेलं पहायचे. कोणी गेलं नाही तर संध्याकाळी सुटकेचा निश्वास सोडायचो. दुसऱ्या दिवशी परत बातमी असायची. इतके लोक पक्ष सोडून जात होते की काही हिशोबच नव्हता. त्यानंतर दोन्ही खिशात काही नाही असं होतं. पण शरद पवार सोलापूरला गेल्यानंतर जी कुस्ती सुरु झाली, ती निकालाच्या दिवशीच संपली,” असा टोलाही सुप्रिया सुळे यांनी लगावला.

शिवसेना आणि शिंदे गटात सध्या सुरू असलेली न्यायालयीन लढाई खूप दुर्दैवी आहे. बाळासाहेब ठाकरे यांना किती वेदना होत असतील. तुमच्यात मतभेद असतील तर वेगळे घर करायला हवे. तुम्हाला शुभेच्छा असतील. पण, ओरबाडून घेतले जात असून ठाकरे कुटुंबावर नको ते आरोप केले जात आहेत. ते बाळासाहेब ठाकरे यांचे नाव वापरत आहेत. मात्र, त्यांना बाळासाहेबांची मुले आणि नातवंडे चालत नाहीत. हे खूप दुर्दैवी असून आपल्या महाराष्ट्राला न शोभणारे आहे, अशी खंत व्यक्त करत शब्दांत सुप्रिया सुळे यांनी शिंदे गटावर निशाणा साधला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here