पिंपरी चिंचवड,दि.20: Supriya Sule: राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या साडीवरील वक्तव्यावरुन (Supriya Sule’s Statement On Saree) वाद निर्माण झाला आहे. शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी महिला पत्रकाराला आधी टिकली लाव मग तुझ्याशी बोलतो असे वक्तव्य केले होते. यावरून बराचसा वाद निर्माण झाला होता. यानंतर आता सुप्रिया सुळे यांनीही महिला पत्रकारांना साडी का नेसत नाही? असा प्रश्न विचारला आहे.
‘चॅनलमधल्या मुली साडी का नाही नेसत? शर्ट आणि ट्राऊजर का घालतात? मराठी भाषा बोलताना? मग मराठी संस्कृतीसारखे कपडे आपण का नाही घालत? आपण सगळ्या गोष्टींचं वेस्टर्नायझेशन करतोय’, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

सुप्रिया सुळे यांच्या या वक्तव्याचा भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी समाचार घेतला आहे. ‘टिकलीवर टीका करणारे साडीवर या नेत्यांना सोलणार का..? चला तुमची परीक्षा एकदा होऊन जाऊ द्या,’ असं ट्वीट चित्रा वाघ यांनी केलं आहे. यासोबतच चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्याचा व्हिडिओदेखील शेअर केला आहे.
काय म्हणाले होते संभाजी भिडे?
शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी महिला पत्रकाराला आधी कुंकू लाव, मग तुझ्याशी बोलतो असे म्हटले होते. एका महिला पत्रकाराने कुकू लावलं नसल्याने संभाजी भिडे यांनी तिच्याशी बोलण्यास नकार दिला. ‘आमची अशी भावना आहे, प्रत्येक स्त्री भारतमातेचं रूप आहे. भारत माता विधवा नाही. कुंकू लाव, मग तुझ्याशी बोलेन,’ अशी प्रतिक्रिया संभाजी भिडे यांनी महिला पत्रकाराला दिली आणि ते निघून गेले.
संभाजी भिडे यांच्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका झाली. याच पार्श्वभूमीवर पुण्यात संभाजी भिडेंविरोधात काँग्रेस महिला आघाडीकडून आंदोलन करण्यात आलं होते.