सुप्रिया सुळे मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी

0

बारामती,दि.7: सुप्रिया सुळे मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी गेल्याने चर्चांना उधाण आले आहे. बारामती लोकसभा मतदार संघात खासदार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात लढत होत आहे. सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी आहेत. मतदान केंद्रावर मतदान करून सुप्रिया सुळे या अजित पवारांच्या घरी दाखल झाल्या आहेत. काटेवाडीतील अजित पवारांच्या निवासस्थानी सुप्रिया सुळे पोहचल्या.

सुप्रिया सुळे यांनी ऐन मतदान सुरू असताना अजित पवारांच्या घरी भेट दिल्याने अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत. यावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रिया सुळेंनी अजित पवारांच्या मातोश्रींची भेट घेतली. सुप्रिया सुळेंनी काकूची भेट घेतल्यानंतर यावर प्रतिक्रिया दिली आहे.

काकू आवर्जून मतदान करायला आल्या म्हणून भेट घेतली, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिली आहे. काटेवाडीतल्या घरी अजित पवार आणि सुनेत्रा पवार नसल्याची माहिती देखील सुप्रिया सुळेंनी या वेळी दिली आहे. 

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

सुप्रिया सुळे म्हणाल्या,  आशा काकींना भेटायला आले होते.  त्यांचा आशिर्वाद घ्यायला आली होती. काकी आवर्जून मतदान करायला आल्या होत्या म्हणून मी आली होती. आम्ही फिरत फिरत नेहमीच येतो. काकींना भेटली आणि निघाले. हे माझ्या काका-काकींचं घर आहे. काकींच्या हातचे चपातीचे लाडू बेस्ट असतात. माझे लहानपण काकूकडेच गेलं आहे. माझ्या आईनं जेवढं केलं नसेल तेवढं आशा काकींनी केलं आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या,  आमच्या घरातील वरिष्ठांचा आशीर्वाद मी कायमच घेते. काकी आणि मीच होते. हे माझ्या काका – काकींचे घर आहे. आशीर्वाद घेतला आणि लगेच निघाले.  माझी प्रत्येक शाळा आणि कॉलेजची सुट्टी दोन महिने दरवर्षी याच घरात जायची.  मी सुट्टीत दोन महिने इथे राहायचे. त्या वेळी फोन नव्हते. मी एकदा इकडे आले की, माझे माझ्या आईशी दोन महिने बोलणे पण होत नसे. माझ्या आईनं जेवढं केलं नसेल तेवढं माझ्या सगळ्या काकींनी केलं आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here