मुंबई,दि.4: खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकमेकांना चॅलेंज दिले आहे. बारामती लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात लढत होत आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या लढतीकडे लागले आहे. शरद पवार आणि अजित पवार या दोघांसाठीही ही निवडणूक जिंकणं प्रतिष्ठेचं आहे. पुण्यातील दौंड तालुक्यात सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीची सभा झाली.
बोलणारा खासदार पाहिजे की ताट वाजवणारा?
तुम्हाला बोलणारा खासदार पाहिजे की ताट वाजवणारा? हा निर्णय तुम्हाला करायचा आहे. बोलणार हवा असला तर आपली तुतारी वाजलीच. माझ्यावर टीका करायला काही नाही म्हणून अशी टीका करतात. माझं चॅलेंज आहे की मी किती वेळा दौंडमध्ये आले आणि तुम्ही किती वेळा दौंडमध्ये आला आहात. याचा हिशोब काढा, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी नाव न घेता अजित पवार यांच्यावर टीका केली.
अजित पवारांनी दिले चॅलेंज
बारामतीमधील लोणी भापकरमधील प्रचारसभेत अजित पवारांनी सुप्रिया सुळेंवर टीका केली. अजित पवार म्हणाले ‘ते आता नुसते येतात 7 तारीख होऊ दे एक जण जरी आला तरी मिशी काढून देईन. खोटं नाही सांगत. त्यांना काहीही पडलेलं नाही. ते म्हणतील आम्हाला आमचा धंदा आहे. आमच्या गाड्या विकायच्या आहेत. आमच्या शो रुमचं कोण पाहाणार. माझं कर्जत-जामखेडचं कोण बघणार? हे माझ्या घरातीलच आहेत. पण आता फार वळवळ-वळवळ, चुरचूर-चुरचूर पोपट कसा बोलतो. तुम्ही माझ्या समोर या… तुमच्या समोर मी बोलतो. बोलायला कोण ऐकंत ते बघू. उगीच आम्ही गप्प बसलोय. आपलेच दात आपलेच ओठ कुठं लोकांसमोर पंचनामा करायचा, असं अजित पवार यांनी कुणाचंही नाव न घेता सुनावलं.
कुणीच माईका लाल
सुप्रिया सुळे म्हणाल्या, “आज दौंडमध्ये दमदाटी करत आहेत. पाणी बंद होईल म्हणून धमक्या देतात. पाणी तुमच्या घरचं नाही. कॅनल तुमच्या घरचा नाही. हे पाणी माझ्या शेतकऱ्यांचा आहे. कुणीच माईका लाल दौंड आणि बारामतीचे पाणी बंद करतो ते बघते. तुमचा ऊस पण कुणी अडवणार नाही. कसं अडववतात ऊस तेच बघते.”
अजित पवार म्हणाले, “10 वर्षात पाण्यासाठी काय निधी आणला? किती दिवस वडीलधारी लोकांचे नाव घेऊन निवडून येणार? मी माझ्या चुलत्याचे नाव घेऊन एकदा निवडून आलो ना? आता कामे दाखवा ना आम्ही शाहू, फुले, आंबेडकरांचा विचार सोडला नाही. काँग्रेसने मुस्लिम समाजाची मते घेतली पण त्यांना न्याय दिला नाही.”