अजित पवार गटाने मुंबईत मंत्रालयाबाहेर लावलेल्या बॅनरची चर्चा

0

मुंबई,दि.५: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जुलै महिन्यापासून उभी फूट पडली आहे. शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडले आहेत. अजित पवार यांनी भाजपासह जात उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील यांच्यासह दिग्गज नेते अजित पवारांसह गेले आहेत. आता लोकसभा निवडणुकीचं घोडामैदानही जवळ आलं आहे. अशात मंत्रालयाबाहेर लागलेल्या बॅनरची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

सुनेत्रा पवारांना उमेदवारी?

शरद पवार गटाला धोबीपछाड देण्यासाठी अजित पवार गट सुनेत्रा पवारांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. याचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे मंत्रालयाबाहेर लागलेला बॅनर. या परिसरात जो बॅनर लागला आहे त्यावर ‘सुनेत्रा पवार बारामतीच्या भावी खासदार’ असा उल्लेख करण्यात आला आहे. मंत्रालयाच्या समोर असलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर बॅनर लागल्याने चर्चांना उधाण आलं आहे. बारामती हा सुप्रिया सुळेंचा लोकसभा मतदार संघ आहे त्या मतदारसंघातून सुनेत्रा पवारांना उभं करण्याचा विचार अजित पवार गटाने पक्का केलेला दिसतो आहे. या बॅनरनंतर याच चर्चा आता सुरु झाल्या आहेत.

अजित पवार गटाने नुकतंच कर्जतमध्ये चिंतन शिबीर आयोजित केलं होतं. या चिंतन शिबिरात अजित पवार यांनी एक भाष्य केलं होतं. सातारा, शिरुर, रायगड आणि बारातमी या चार लोकसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट उमेदवार देणार असल्याचं अजित पवारांनी म्हटलं होतं. त्यानंतर दोनच दिवसात हा बॅनर लागला आहे. सुनेत्रा पवार बारामती मतदारसंघातून खासदार होतील हा दावा करत भावी खासदार सुनेत्रा पवार अशी बॅनरबाजी करण्यात आली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here