चंडीगड,दि.28: काँग्रेसचे आमदार सुखपाल सिंग खैरा (Sukhpal Singh Khaira) यांना पोलिसांनी गुरूवारी सकाळी अटक करण्यात आली. पंजाब पोलिसांनी गुरुवारी पहाटे एका कारवाईदरम्यान सुखपाल सिंग खैरा यांना चंडीगड येथील सेक्टर-5 येथील त्यांच्या निवासस्थानातून अटक केली. सूत्रांनी सांगितले की, फाजिल्का येथील जलालाबाद अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थ (NDPS Act, 1985) कायद्यांतर्गत नोंदवलेल्या जुन्या गुन्ह्याच्या संदर्भात त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईसाठी पोलीस अधीक्षक (एसपी) दर्जाच्या अधिकाऱ्यासह फाजिल्का पोलिसांचे पथक आमदार खैरा यांच्या निवासस्थानी पोहोचले होते.
Sukhpal Singh Khaira: काँग्रेस आमदार सुखपाल सिंग खैरा यांना अटक
संतप्त सुखपाल सिंग खैरा यांनी पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित करत राज्य सरकारवर मनमानी केल्याचा आरोप केला आहे. तसेच, राजकीय हिशोब चुकता करण्यासाठी असा छळ केला जात असल्याचे सुखपाल सिंग खैरा यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सांगितले. दरम्यान, सुखपाल सिंग खैरा यांच्या फेसबुक लाइव्ह व्हिडीओमध्ये ते पोलिस कर्मचाऱ्यांशी वाद घालताना दिसत आहेत. वॉरंट दाखवण्याची मागणी ते पोलिसांकडे करत आहे. काही साध्या वेशात असल्याने ते पोलिस कर्मचाऱ्यांना स्वतःची ओळख दाखवण्यास सांगत आहे.
याआधी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सुखपाल सिंग खैरा यांना 2015 च्या एका प्रकरणात चौकशीसाठी बोलावले होते आणि त्यांना अटक केली होती. ईडीने सुखपाल सिंग खैरा यांच्यावर ड्रग्ज प्रकरणातील आरोपी आणि बनावट पासपोर्ट रॅकेट करणाऱ्यांना पाठिंबा दिल्याचा आरोप केला होता. तसेच, ड्रग प्रकरणी 2015 पासून ईडी सुखपाल सिंग खैरा यांची चौकशी करत आहे. त्यांच्या भुलत्थ येथील निवासस्थानावरही छापा टाकण्यात आला होता. अलिकडेच, सुखपाल सिंग खैरा यांनी आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार राघव चढ्ढा यांच्या लग्नाच्या खर्चावर प्रश्न उपस्थित केला होता. ते म्हणाले होते की, एक सामान्य माणूस 7 स्टार हॉटेलमध्ये लग्न कसे करू शकतो? अशा हॉटेल्समध्ये तुम्हाला एका रात्रीसाठी 10 लाख रुपये खर्च करावे लागतील.