मुंबई,दि.६: महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी मोठी घोषणा केली आहे. याआधीही सुधीर मुनगंटीवार यांनी मोठी माहिती दिली होती. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांविषयींच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापले असतानाच आता सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी एक मोठी घोषणा केली आहे. त्यानुसार राज्य सरकार छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखं ब्रिटनमधून परत आणण्याचा प्रयत्न करणार आहे.
वाघनखं पुन्हा भारतात आणण्यासाठी पाठपुरावा करणार: सुधीर मुनगंटीवार
शिवाजी महाराजांनी अफजलखानाला मारण्यासाठी वापरलेल्या वाघनखांबाबत नेहमीच चर्चा असते. ही वाघनखं इंग्लंडच्या वस्तुसंग्रहालयात आहेत. ही वाघनखं पुन्हा भारतात आणण्यासाठी आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे पाठपुरावा करत आहोत. पुढील वर्षी होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्यापूर्वी ही वाघनखं पुन्हा भारतात आणण्याचा प्रयत्न असेल, अशी माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. या आधी शिवरायांची जगदंबा तलवार परत आणण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले होते.
शिवरायांची वाघनखं पुन्हा भारतात आणण्याचा प्रयत्न सुरु
शिवकालीन इतिहासात प्रतापगडाच्या पायथ्याशी झालेल्या अफजलखान वधाच्या घटनेला मोठे महत्त्वं आहे. या घटनेचा दाखला देत आजही शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे गोडवे गायले जातात. त्यामुळे या घटनेशी संबंधित असलेल्या प्रत्येक गोष्टीबाबत शिवप्रेमींमध्ये कुतूहल आहे. याच पार्श्वभूमीवर आता शिंदे-फडणवीस सरकारने शिवरायांची वाघनखं पुन्हा भारतात आणण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.
२०२४ साली ३५१ वा शिवराज्याभिषेक दिन
२०२४ साली ३५१ वा शिवराज्याभिषेक दिन साजरा केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाकडून या वर्षभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार आणि वाघनखं पुन्हा भारतात आणण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचे समजते.