Omicron च्या पार्श्वभूमीवर राज्यातील या जिल्ह्यात कठोर नियम

0

नाशिक,दि.१६: ओमिक्रॉन व्हेरिएंट (Omicron Variant) रुग्ण आढळत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. देशात अनेक राज्यात ओमिक्रॉनचे (Omicron) रुग्ण आढळत आहेत. ओमिक्रॉनच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य प्रशासन सतर्क झाले असून प्रत्येक जिल्ह्यात कोविड प्रतिबंधक लसीकरणावर भर दिला जात आहे. जास्तीत जास्त लोकांनी लवकर लसीकरण करावे म्हणून वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत. तरीही दाद न देणाऱ्या नागरिकांना चाप लावण्यासाठी नाशिक (Nashik) जिल्हा प्रशासनानं मोठा निर्णय घेतला आहे. लसीकरण पूर्ण न झालेल्या नागरिकांना कुठल्याही सार्वजनिक ठिकाणांवर प्रवेश दिला जाणार नाही, असा नियम नाशिकमध्ये करण्यात आला आहे.

कोरोना (Corona) आढावा बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आज ही माहिती दिली. लसीकरणाबाबतचा नवा नियम २३ डिसेंबरपासून लागू होणार आहे. नागरिकांना एक आठवड्याची मुदत दिली जाणार आहे. सर्व सार्वजनिक आस्थापना व सार्वजनिक ठिकाणांसाठी हा नियम लागू असेल. एखाद्या ठिकाणी विना लसीकरण लोक आढळले तर संबंधित आस्थापनांना जबाबदार धरलं जाईल, असंही भुजबळ यांनी सांगितलं.

मिळालेल्या माहितीनुसार, आताच्या घडीला नाशिकमध्ये ४०१ कोरोना रुग्ण असून, पॉझिटिव्हिटी रेट ०.०८ टक्के आहे. तर मृत्यू दर २.११ टक्के आहे. तसेच म्युकरमायकोसिसचे १२ रुग्ण असून, ३७३ मेट्रिक टन ऑक्सिजनची तयारी करण्यात येत आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली आहे. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर १० हजार किट विकत घेण्याची सूचना केली आहे. तर, ८७ टक्के लसीकरण झाल्याचे सांगितले जात आहे. 

थर्टी फर्स्ट पार्ट्यांचा निर्णय लवकरच!

‘३१ डिसेंबरच्या पार्ट्यांबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल. पण हॉटेलांनी लोकांच्या तपासण्या करणं गरजेचं आहे. फाईव्ह स्टार हॉटेल असो किंवा इतर कोणतेही हॉटेल असेल परवानगी देताना अटींची पूर्तता होत नसेल तर पोलिसांची कारवाई होईल. ज्यांना कार्यक्रम करायचे आहेत, त्यांनी काळजी घेतली पाहिजे. ३१ डिसेंबरला गर्दी करण्यापेक्षा आतापासूनच संयमानं सेलिब्रेशन केल्यास नंतर होणारी गर्दी टळेल, असा सल्लाही भुजबळ यांनी दिला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here